पावसाळ्यापूर्वी साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात भारतातील बहुतांश भागात चातक पक्षी स्थलांतर करून येतो. चातक पक्षाचे आगमन हे त्याच्या आवाजावरून लक्षात येते. याच काळात त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो त्यामुळे ते नर मादी पक्षी एकमेकांना विशिष्ट आवाज काढून साद – प्रतिसाद देत असतात. आणि हा आवाज शेतकऱ्यांना कानावर पडला की शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेती मशागत करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. महाराष्ट्रात तर या चातक पक्षासोबत येणारा पावशा पक्षी याच काळात आवाज काढत असतो त्याचा अर्थ शेतकरी लावतो की, *”पेरते व्हा…. पेरते व्हा…..”* असा आवाजाचा अर्थ लावून शेतकरी मशागतीच्या कामाला लागतो.
पूर्वीपासून चातक पक्षी स्थलांतर करून भारतात आल्यानंतर दिसतो त्याचा अर्थ काही लोकांनी ‘तो फक्त पावसाचे पाणी पितो’ असा लावला असावा. कारण पावसाळा संपला की त्याचा आवाज परत गेल्यामुळे ऐकू येत नाही. त्यामुळे तसा कयास त्यावेळी लावला असेल आणि तशीच रूढ पडली असावी की, “चातक पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो” पण *वास्तविक पाहता चातक पक्षी हा जमिनीवरील पाणी सुद्धा पित असतो तसे पुरावे फोटोंसह सुद्धा आहेत. त्यामुळे चातक पक्षी हे फक्त पावसाचे पाणी पितो हा गैरसमज आजपर्यंत रूढ होत आलेला आहे असे मला वाटते.* जर आपल्याला याबाबत काही माहिती असेल तर जरूर सांगावी.
चातक पक्षाचे नुकतेच मी काढलेले काही फोटो पोस्ट स्वरूपात आपल्यासमोर ठेवले आहेत.
*(धनंजय गुट्टे, वन्यजीवप्रेमी)*

