
पुणे पोलीस आयुक्तांचा पुढाकार
मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन
लातूर : पुणे शहरात येणाऱ्या सर्व खासगी बसवर निर्बंध घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी दिले होते या निर्णयाविरुद्ध पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने १५ जूनपासून खासगी प्रवासी बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे काल एका पत्रकान्वये जाहीर केले आहे.
पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि असोशिएशनचे पदाधिकारी यांच्यात या बंदबाबत काल बैठक पार पडली. ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर १५ जूनपासून केले जाणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने घेतला असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.
दरम्यान, पुणे येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या आंदोलनाला लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देत बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पत्र लातूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले होते. हे आंदोलन स्थगित झाल्याने लातूर येथील सर्व खासगी प्रवासी वाहतूक नियमितपणे सुरू राहील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

