
लातूर: किडझी इन्फो पार्क स्कूल, पेठ, लातूर येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘योग संगम’ या विशेष सिग्नेचर कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान (MDNIY), नवी दिल्ली (आयुष मंत्रालय, भारत सरकार) आणि महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद प्रणव निसर्गोपचार व योग केंद्र, नंदनवन कॉलनी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

या विशेष योग उपक्रमात 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यात किडझी इन्फो पार्क स्कूलच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका श्रीमती प्रीती शहा, सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत पंचाक्षरी, डॉ. किरण सगरे पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद, लातूर) आणि डॉ. सृष्टी पांचाक्षरी-सगरे पाटील उपस्थित होते.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय योग मनोऱ्यांचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर डॉ. सृष्टी पांचाक्षरी-सगरे पाटील यांनी मंचावरील सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांसमवेत कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योग सत्र घेतले. त्यांनी आपल्या भाषणात योग ही भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, योगाचे महत्त्व समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

डॉ. किरण सगरे पाटील यांनी यावर्षीच्या ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ या थीमवर भाष्य करताना सांगितले की, योगामुळे माणूस केवळ स्वतःपुरता मर्यादित राहत नाही तर तो कुटुंब, समाज, देश आणि पर्यावरण यांच्याशी जोडला जातो. योग ही एकात्मतेकडे नेणारी वाट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमती प्रीती शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, योग फक्त शारीरिक व्यायाम नसून जीवनमूल्यांची शिकवण देणारी पद्धती आहे. त्यामुळे योगाचे आचरण ही जगभरातील गरज बनली आहे.

या कार्यक्रमात शिक्षक अजित बजाज, राठोड मॅडम, संगीता मॅडम, ज्योती मॅडम, आकाश मोहिते सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन नूतन पाटील आणि नयना पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन अॅड. रामेश्वर सगरे पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील कर्मचारी व योग प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. ‘योग संगम 2025’ हे लातूरसारख्या जिल्ह्यात योगप्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

