
अभय मिरजकर, लातूर
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत तसेच नंतरही काही प्रवास वर्णन असणारे साहित्य वाचलेले. पञकार म्हणून कार्यरत असताना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दापोली अभ्यास सहल, दिल्ली , गोंदिया आणि आता चंद्रपूर अशा प्रशिक्षण, कार्यशाळांमधून सहभाग नोंदवला. परंतु चंद्रपूरचा प्रवास काही वेगळाच होता आणि या प्रवासा संदर्भात थोडेसे लिहावे असे वाटले म्हणून हा प्रपंच ………

चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, यांच्या वतीने चंद्रपूर येथे दिनांक १४ ते १६ जुलै, २०२५ या कालावधीत वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे करीता “वन्यजीव व जैवविविधता संवर्धन” या विषयावर तीन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लातूर येथून माझी (अभय मिरजकर)तसेच संगम कोटलवार, नरसिंह घोणे, शहाजी पवार आणि दीपरत्न निलंगेकर अशा पाच जणांची निवड करण्यात आली होती. परंतु मुंबई येथील कामामुळे दीपरत्न निलंगेकर यांनी नकार दर्शवला. त्यामुळे आम्ही चारजण जाण्याचे निश्चित झाले. आमचे मिञ नरसिंह घोणे यांनी सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवा, निश्चिंत रहा . मी घेऊन जातो आणि परत सुखरूप घेऊन येतो असा शब्द दिलेला. त्यामुळे सर्व जण निवांत झालेलो.

नांदेड येथून जायचं आहे, दुपारी दोन वाजता सर्वांनी जमायचे असा आदेश त्यांनी सोडलेला. त्यामुळे मी, शहाजी पवार, संगम कोटलवार, दिलेल्या वेळेत बसस्थानकावर हजर झालो. आम्हाला घेऊन जाणारे आमचे सारथी नरसिंह घोणे हेच लवकर आले नाहीत. सर्वजण त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत असताना त्यांनी संगम कोटलवार यांना सांगितले आलोच, दोन मिनिटात उड्डाण पुलावर आहे असे म्हटले आणि आम्ही थेट नांदेड एसटी बस मध्ये जागा धरण्यासाठी धडपड सुरू केली. एसटी बस मध्ये तिघांनी आपल्या बॅगा ठेवल्या आणि एक जागा पकडून सारथी घोणे यांची वाट पाहणे सुरू झाले. अर्ध्या तासानंतर बस पण सुरू झाली आणि आम्ही थेट नांदेड ही गाठले पण आमचे सारथी काही आलेच नाहीत.

नांदेड येथून चंद्रपूर साठी रात्री नऊ वाजता साडेनऊ वाजता थेट बस आहे असे त्यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे नांदेड वरून आदिलाबाद पर्यंत रेल्वेने आणि आदिलाबाद वरून चंद्रपूर पर्यंत रेल्वेने पण जाता येते असे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही रिझर्वेशन न करता थेट निघालो होतो. जेंव्हा नांदेड बसस्थानकावर पोहोचल्यानंतर तेथील कंट्रोलरने नांदेड वरुन चंद्रपुरास गाडीच नाही. सकाळी सात वाजता बस आहे असे सांगितले तेव्हा आमचे तिघांचे ही चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आमच्या सावकारांनी तर आता अगोदर चहा हवा नंतरच पुढचं पाहू असे म्हटले आणि टपरी गाठली. दरम्यान आमच्या सारथींना भ्रमणध्वनीवरून संपर्क सुरूच होता . ते पण एवढे भारी की, आलोच पाच मिनिटांत लोहा नांदेडच्या मध्ये आहे लोहा आता सोडले आहे एवढाच हेका कायम ठेऊन होते. नांदेड रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर आदिलाबाद पर्यंतचे जेव्हा तिकीट काढण्याची वेळ आली तेव्हा आमच्या सारथींनी तुमच्या तिघांची तिकीट काढा असे सांगून टाकले. त्यामुळे आता काही ते येणार नाहीत हे आम्ही जाणले आणि तिघांची आदिलाबाद पर्यंतची तिकिटे काढून घेतली. नांदेड वरून आदिलाबाद साठी जाणारी पॅसेंजर रेल्वे तब्बल दोन तास उशिरा आली. त्यामुळे मध्यरात्री पावणेदोन च्या सुमारास आम्ही सर्वजण आदीलाबाद रेल्वे स्थानकावर उतरलो.

दरम्यानच्या काळात प्रवासात सहप्रवाशांकडून समजले की आदीलाबाद वरून चंद्रपूर साठी पहाटे एसटी बसेस आहेत. त्यामुळे बस स्थानकावर जाऊन बसल्याशिवाय पर्याय नव्हता.
आदिलाबाद येथे राहणारे अशोक धुळे नावाचे ऑटो रिक्षा चालक आम्हाला भेटले आणि त्यांनी आदिलाबाद बस स्थानकावर आम्हाला सोडले. दरम्यानच्या प्रवासात त्यांनी आम्हाला थेट ऑटो मधून चंद्रपूरला सोडण्याची ऑफर दिली आणि दोन हजार रुपये लागतील असे सांगितले. आदिलाबाद बस स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथील कंट्रोलरने सकाळी सहा वाजता एसटी बस असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्या बसनेच जावा. खाजगी वाहनाने जाऊ नका असाही प्रेमळ सल्ला त्यांनी दिला.
दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या सारथींचा भ्रमणध्वनी वाजवण्याचे काम सुरूच ठेवले होते. आमच्या तिघांचेही ठाम मत होते कि ते काही येणार नाहीत. परंतु मी ही त्यांना रात्री झोपू द्यायचे नाही असे ठरवून थोड्या थोड्या वेळाने भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचे काम सुरू ठेवले होते. ते पण तेवढेच बहाद्दर की एकदा हे त्यांनी फोन उचलला नाही. शेवटी जेव्हा फोन उचलला तेव्हा त्यांनी सांगितले की पाच मिनिटात बस स्टॅन्ड वर येत आहे. ही आम्हाला थापच वाटली. आणि दहा मिनिटात खरंच आमचे सारथी घोणेबापू हैदराबाद नागपूर बसमधून बस स्थानकावर उतरले. एखाद्या जादूगाराने जादूची कांडी फिरवून कबूतर , चिमणी असे पक्षी बाहेर काढून दाखवावे तसा भास आम्हाला आमचे सारथी आमच्यासमोर येताच झाला.
बस स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. बस स्थानकाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर आम्ही दोघे फिरलो. दरम्यानच्या काळात पुन्हा आमच्या ऑटो चालक सारथी यांचा हेका सुरूच होता. चला साहेब, मी तुम्हाला चंद्रपूरला नेऊन सोडतो. सोळाशे रुपये द्या, त्याखाली काही होणार नाही. रात्रीचे सव्वादोन वाजलेले. सकाळी गाडी सहा वाजता , एस. टी बसने पोहोंचायला अडीच तास जरी म्हटले तरी साडे आठ नऊ वाजतील असा हिशोब आम्ही लावलेला. त्यामुळे शेवटी सर्वांनी काही हो, चला ॲटोरिक्षाने चंद्रपूर गाठू असे ठरवले आणि अशोक धुळे यांना चंद्रपूरला चालण्याचा आदेश दिला. निघतानाच त्यांनी ऑटो मध्ये डिझेल भरले, साहेब मी जय भीम वाला आहे असे सांगितले आणि आमचा चंद्रपूर प्रवास सुरू झाला. रात्री अडीच वाजता आम्ही आदीलाबाद सोडले आणि आमची ऑटो रिक्षा चंद्रपूरच्या दिशेने धावू लागली. आमचे मुख्य सारथी नरसिंह बापू घोणे हे रिक्षाच्या समोरच्या बाजूला चालकाच्या जवळ बसले आणि मी, शहाजी आणि सावकार पाठीमागे बसलो. सुरुवातीचा रस्ता एकदम चांगला असल्यामुळे सुसाट ऑटो धावत होता. मात्र जेव्हा ऑटो रिक्षा चंद्रपूर रस्त्याला लागली आणि नंतर मात्र सर्वत्र रस्त्याच्या पुलांची कामे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑटो चा वेग खूपच मंदावला. तब्बल 110 किलोमीटरचे अंतर साडेचार ते पाच वाजेपर्यंत चंद्रपुरात पोहोचवतो असे सांगणारे आमचे ऑटो चालक सारथी एकदमच शांत झाले. एवढा रस्ता खराब आहे हे मला माहिती नव्हते, माहिती असते तर मी आलोच नसतो . असे सांगत कासव वतीने ऑटो रिक्षा चालत होता. अधून मधून समोरून आणि पाठीमागून एखाद दुसरे वाहन जात होते.
आदिलाबाद चंद्रपूर रोडवरील कोरपना गावाजवळ उड्डाणपुलाखाली एका चहा वाल्याकडे चहा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे चहा ऐवजी चिवडा खाऊन पुढील प्रवासाला निघालो. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आमच्या ऑटो चालक सारथीने आम्हाला चंद्रपूरच्या वन अकादमीच्या आत मध्ये असणाऱ्या वस्तीगृहाजवळ आणून सोडले. आणि आमचा लातूर पासून सुरू झालेला चंद्रपूरचा प्रवास संपला. ……
अभय मिरजकर
9923001824

