
लातूर, दि. 14 जुलै 2025
कोरोनाच्या काळात लातूरकरांच्या एकजुटीने उभा राहिलेला ‘स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प’ आता जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील लष्करी रुग्णालयात देशसेवेच्या कार्यात सहभागी होणार आहे. लातूरच्या मातीतून उगम पावलेला हा प्रकल्प आता सीमाभागातील जवानांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरणार आहे.
2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेत लातूरमध्ये ऑक्सिजनसाठी मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी लातूरच्या नागरिकांनी एकत्र येत “लातूरसाठी, लातूरकरांकडून” असा निर्धार करत ‘स्पंदन’ ऑक्सिजन प्लांट उभारला. नागरिकांच्या दानशूरतेच्या जोरावर काही महिन्यांत उभा राहिलेल्या या प्रकल्पातून शेकडो रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा देण्यात आली. रुग्णालयांमध्येच नव्हे, तर घरीही ही सेवा पोहोचली.
कोरोनाची गरज ओसरल्यावरही प्लांट कार्यरत ठेवण्यात आला, मात्र मागणी घटल्याने त्याचा उपयोग मर्यादित राहिला. अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी अडचणी येत असल्याचे समजताच, स्पंदन टीमने हा प्लांट सैन्य सेवेसाठी राष्ट्रार्पण करण्याचा निर्णय घेतला.
लष्कराशी पत्रव्यवहार, प्लांटची चाचणी, देखभाल आणि वाहतुकीची तयारी पूर्ण करून, स्पंदन प्रकल्प 14 जुलै रोजी लातूरमधून जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला. सध्या पुंछ सेक्टरमधील लष्करी रुग्णालयात प्लांटचे स्थापत्यकार्य सुरू आहे.
या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने, लातूरमध्ये ‘राष्ट्रार्पण समारंभ’ आयोजित करण्यात आला. श्री गुरुजी आय.टी.आय. वासनगाव रोड येथे पार पडलेल्या या समारंभात अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती आणि लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पंदन टीमच्या वतीने सांगण्यात आले की,
“हे केवळ एक मशीनच नाही, तर लातूरच्या माणुसकीची आणि देशभक्तीची झळाळती साक्ष आहे. वीर जवानांच्या आरोग्यासाठी आपण लातूरकर काहीतरी देऊ शकलो, हे केवळ सौभाग्य नव्हे तर राष्ट्रऋणाच्या परतफेडीचा एक प्रयत्न आहे.”
स्पंदन प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी लातूरकरांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि सहभाग याबद्दल टीमने सर्वांचे आभार मानले.
जय हिंद! जय लातूर!!
— दीपरत्न निलंगेकर, लातूर

