
खरे तर भिक्खू आपला जन्मदिन साजरा करत नाहीत पण एक उपासक/अनुयायी म्हणून भंतेजी चे मनोबल वाढवण्या साठी, एक तरुण भिक्खू अविरतपणे धम्म प्रचार प्रसाराचे काम करीत असल्यामुळे हा लेखणाचा खटाटोप केला आहे.
दि. २५ जून हा दिवस एक अत्यंत प्रेरणादायी दिन आहे, कारण याच दिवशी बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे, भिक्खू पय्यानंद थेरो यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे समाजप्रबोधन, धम्मप्रसार आणि तरुणांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वाहिले गेलेले आहे.
धम्माचा गाढा अभ्यास, आचारधर्माची निष्ठा आणि बुद्धत्वाचा प्रसार करण्याची ऊर्जा यामुळेच पु. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले आणि लातूरसारख्या भूमीत धम्मवृक्ष फुलवण्यासाठी पाठवले.
विशेष म्हणजे, त्यांनी आजवर असंख्य उपासक घडवले. त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि आचारधर्माने प्रभावित होऊन अनेकांनी धम्माचा स्वीकार केला. उपासक वर्ग आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत त्यांच्यामुळे निर्माण झाला आहे. विचारहीनतेत हरवलेल्या तरुणांना धम्माचा आधार देत त्यांनी व्यसनांपासून परावृत्त केलं आणि त्यांना एक नवी दिशा दिली.
लातूर शहरात २०१६ मध्ये त्यांनी जे भव्य संघदान सोहळ्याचे आयोजन केले, त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी लातूर शहरात ‘महाविहार’ उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि अहोरात्र मेहनत घेऊन समाजाच्या बळावर तब्बल नऊ एकर जमीन खरेदी केली. आज त्या भूमीत सातकर्णी नगरमध्ये अविरतपणे धम्मपरिषदाचे आयोजन करतात तसेच प्रत्येक पौर्णिमेला उत्साही वातावरणात धम्म कार्य घडवतात.
‘दर रविवार चलो बुद्ध विहार’ हा त्यांचा अभिनव उपक्रम आज लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये धम्मज्योती प्रज्वलित करत आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांनी आयोजित केलेला महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.
भिक्खू जीवन आणि बौद्ध तत्त्वज्ञान युवकांना प्रत्यक्ष अनुभवता यावे यासाठी त्यांनी अनेक श्रामणेर शिबिरे सामूहिक चारिकासह आयोजित केली. त्यामुळे अनेक व्यसनाधीन तरुणांनी आपले वाईट सवयी सोडून धम्म मार्ग स्वीकारला.
विदेशातील बौद्ध परंपरा देखील आपल्या उपासकांना अनुभवता यावी यासाठी त्यांनी थाईलँड,श्रीलंका, जपान,भूतान ई. अनेक देशांत धम्म अभ्यास सहली घडवून आणल्या. यामधून आंतरराष्ट्रीय धम्मसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
भिक्खू पय्यानंद थेरो हे केवळ धम्मगुरु नाहीत, तर एक विचारवंत, समाजप्रबोधक आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जन्मदिनी त्यांना सम्यक शुभेच्छा देताना आपणही ठरवू या की बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचा दीप आपल्या आयुष्यात तेवत ठेऊ..
भिक्खू पय्यानंद थेरो यांना त्रिवार वंदन व जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

