
अरुणा दिवेगावकर, लातूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संघर्षगाथा: बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास हे पुस्तक वाचताना त्यातील संघर्षांच्या कथा मला रिलेट होत होत्या. कारण 30-40 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे या मुलींसारख्या लहान खेडेगावात किंवा गावनुमा छोट्या शहरात रहाणार्या आम्हा मुलींचा शिक्षणासाठीचा संघर्ष देखील तसाच होता. देश ‘जागतिक महासत्ता’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना देखील या परिस्थितीत काही फरक पडला नाही किंबहुना असं म्हणावं लागेल की, मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केलेल्या फुले दांपत्याच्या प्रयत्नांना पूर्ण यश आलं आहे असं म्हणण्यासाठी अजून ही कितीतरी काळ वाट पहावी लागणार आहे. अतिशयोक्ती वाटेल पण हे सत्य आहे आणि ही ‘संघर्षगाथा’ त्याचा पुरावा आहे. लातूर जिल्हा शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जात परंतू याच लातूर शहराचा परिघ ओलांडून जेंव्हा वाड्या-वस्त्या पर्यंत आपण जातो तेव्हा मुलींच्या शिक्षणाची सगळ्याच स्तरांवर काय दशा आहे ते या दस्तावेजातून लक्षात येतं . पुरुषसत्ताकतेच जोखड , जात-धर्माच्या चौकटी, घराघरातील लिंगभेदाची भीषण वास्तविकता, समाजभय, रुढी-परंपरेच्या चौकटी, प्रादेशिक असमतोलातून आलेली आर्थिक चणचण, कुटुंब प्रमुखांची व्यसनाधीनता या सगळ्या उभ्या आडव्या स्तरां बरोबरच शिक्षणाच्या सोयींचा अभाव ही सगळी सामाजिक गुंतागुंत या मुली समजावून सांगताना दिसतात.
या सगळ्या मुलींच्या व्यक्त होण्यातून मला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे विज्ञान-गणित-इंग्रजी या तीन विषयांची दहशत! जी मी अनुभवली आहे. याची कारणं शोधताना मी जेंव्हा मागे वळून बघते तेंव्हा मला लक्षात आली त्यातील महत्त्वाचं कारण हे होतं कि , तज्ञ शिक्षकांचा अभाव. (मी देखील खेडेगाव ते तालुका याच शाळां मधून शिक्षण घेतले आहे) त्यामुळे या विषयांची भीती कायम असायची आणि त्यातून न्यूनगंड निर्माण व्हायचा. ही स्थिती आजही कायम आहे. किंबहुना वाढलेली आहे. आणि ही स्थिती केवळ लातूर जिल्ह्य़ातच आहे का तर नाही सर्वत्र आहे.
इंग्रजी भाषा जागतिक भाषा म्हणून आपण स्विकारली पण ती कशी शिकवायची हे बहुदा शिकायच राहून गेलं. मातृभाषा नीट कळण्या आधीच जर इतरही भाषांचं ओझ लादलं गेलं तर काय होणार ? इंग्रजी येत नाही म्हणून आत्मविश्वास कमी, आत्मविश्वास कमी म्हणून मग अभ्यास नकोसा वाटणं हे दुष्टचक्र सुरु होतं.
हा दस्तावेज वाचताना आजही मुलींना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो आहे हे तर लक्षात आणून देतोच परंतु आपल्या शिक्षण पद्धतीतील उणिवा, दोष देखील अधोरेखित करतो.
पण या सगळ्या अभावातून या लुकलुकत्या पणत्या कशा तेवत आहेत हे मुळातून वाचायला हवं.
या मुलींना व्यक्त होण्यासाठी, लिहीतं करण्यासाठी प्रा. अनिल जायभाये सर आणि प्रा.पंचशील डावखर मॅडम यांनी घेतलेली मेहनत खूप मोलाची आहे. हरिती प्रकाशनाकडून प्रकाशीत झालेलं हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तकाचे नाव : संघर्षगाथा:विद्यार्थिनींचा जीवनप्रवास, संपादक : अनिल जायभाये, पंचशील डावकर, हरिती प्रकाशन, पुणे, 2025.

