
लातूर, दि. ०२ ऑगस्ट २०२५ :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘एक तास निरोगी आरोग्यासाठी – आनंदी शनिवार’ या आरोग्यवर्धक उपक्रमाचे आयोजन दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमनजी लाहोटी व सचिव श्री. रमेश बियाणी यांच्या मार्गदर्शनाने, तसेच प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमती तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, लातूर या होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात निरोगी शरीर आणि सुदृढ मन यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत विद्यार्थ्यांना दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक सवयी रुजवण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, मानसिक तणावमुक्तता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.” त्यांनी नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि मानसिक आरोग्य या घटकांवर भर देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमातील ‘झुंबा डान्स सत्र’ हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रशिक्षक श्री. सुनील वेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य, अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर मनसोक्त व्यायाम केला. सहभागी विद्यार्थ्यांनी या सत्रामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आनंद अनुभवल्याचे सांगितले.

‘आनंदी शनिवार’ या उपक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालयात आरोग्यप्रेमी व आनंदी वातावरण निर्माण झाले. सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह झळकत होता.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय व्यास यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सांस्कृतिक विभागाचे डॉ. संदीपान जगदाळे व प्रा. मनोज गवरे यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. ममता पिंपळे यांनी प्रभावीपणे केले.

