लातूर जिल्ह्यात खळबळ निर्माण करणाऱ्या सेवालय सर्भात गुन्हा नोंद झाल्यापासून समाजसेवेचे व्रत घेऊन तब्बल दोन तप कार्य करणाऱ्या या संस्थेत असे घडणारच नाही असा कयास अनेकजण करीत होते.सवालयाचे हितचिंतक आणि मित्र परिवारांनी तर लातूरच्या गांधी चौक येथे धरणे करीत या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी आणि सेवालयातील मुलांचे स्थलांतर थांबवा अशी मागणी केली होती…
आता आज लातूरचे ज्येष्ठ पत्रकार महारुद्र मंडळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केले आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित फिर्याद देणाऱ्या मुलीचा अगोदरच विवाह झाला होता याबाबत ची माहिती नोंदवले यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे… एखादा संवेदनशील पत्रकार जर आपल्या माहितीच्या मदतीने या प्रकरणातील सत्य शोधत असताना या सर्व बाबी एवढ्या स्पष्ट नोंदवत असेल तर या प्रकरणांमध्ये तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहेत याबाबत आता जनतेमध्ये चर्चा सुरू आहे…
ज्येष्ठ पत्रकार महारुद्र मंडळे यांची फेसबुक अकाउंट वरील पोस्ट या ठिकाणी आम्ही जशास तशी देत आहोत..
सेवालय प्रकरण हे कट-कारस्थानच आहे!
…………………………………………..
सेवालय बालगृहातील बालिकेचे कथित लैंगिक अत्याचाराचे प्रकरण एका कट- कारस्थानाचा भाग आहे,हे मी पहिल्या दिवसापासून ठामपणे सांगतोय.इथे त्याला पुरक घटनाक्रम मी मांडतोय . याला कागदपत्र व मोबाईल मधील नोंदीचा आधार आहे .
घटनाक्रम १)
बालकल्याण समिती लातूर च्या आदेशाने १३-७-२३ रोजी ही बालिका औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालय बालगृहात दाखल झाली . तिचे इथले दैनंदिन जीवन सुरळीत सुरु झाले . तिला हासेगावातील शाळेत ८ वीला प्रवेश देण्यात आला . ३० जुलै २३ रोजी तिने बालगृहातील मुलींची काळजीवाहक श्रीमती छाया श्रीरामजवार यांच्याकडे तिला मासिक पाळी येत नसल्याची तोंडी तक्रार केली .त्यांनी ही माहिती बालगृहाच्या अधीक्षिका रचना बापटणे याना कळवली. बापटणे यांनी बालगृहाची वैद्यकीय कर्मचारी विठाबाई वाघमारे हिला तिला रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे विठाबाई वाघमारे ही ३१ जुलै २३ रोजी तिला लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.तिथे तपासणी झाली.तिची प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह आली शिवाय सोनोग्राफी व रक्त चाचण्याही करण्यात आल्या. तेथील डॉक्टरांनीं तिला औषधगोळ्या दिल्या . रुग्णालयाने वैद्यकीय अहवालात तिला ८ महिने आधीपासून मासिक पाळी येत नव्हती,असे नोंदवले आहे . तिथून आल्यानंतर ती नियमितपणे औषध गोळ्या घेत होती . २२ ऑगट २३ ला तिने तिला मासिक पाळी आल्याचे काळजीवाहक छायाताई यांना सांगितले . त्यांनी ती माहिती बालगृह अधीक्षक यांना दिली. त्यानंतर १४ – ०५-२०२५ ला सेवालय बालगृह सोडेपर्यंत तिला नियमित पाळी येत गेली .याच्या रीतसर नोंदी सेवालय बालगृहात उपलब्ध आहेत .
घटनाक्रम २)
३-०५-२०२५ रोजी पीडीत बालिकेने सेवागृह बालगृह अधिक्षिका यांच्याकडे आजारी आजोबाना भेटीला जाण्यासाठी म्हणून सुट्टीची मागणी केली .
हा अर्ज बालकल्याण समिती लातूरकडे ७-०५-२०२५ रोजी पाठवण्यात आला.बालकल्याण समितीने तिला ८ ते १२ मे २५ पर्यंत सुट्टीचा आदेश दिला मात्र या काळात तिला नेण्यासाठी सेवालयात कोणीही आले नाही . प्रत्यक्षात १४ मे २५ रोजी तिची आजी तिला नेण्यासाठी आली. तिची सुटी संपली असतानाही, माणुसकीच्या भूमिकेतून आजारी आजोबाला तिला भेटता यावे म्हणून सेवालयाने तिला तिच्या आजी सोबत पाठविण्याचा निर्णय केला .
तिला पाठवताना एआरटी मार्फत मिळणाऱ्या ८ दिवसाच्या गोळ्या देऊन बजावले की , या गोळ्या संपण्याच्या आत तू सेवालयात परत ये. याला होकार देऊन ते गेले .
घटनाक्रम ३)
दोन आठवडे उलटले तरी ती परत न आल्याने संस्थेच्या अधिक्षका रचना बापटणे यांनी वारंवार तिच्याशी संपर्क केला पण तिने प्रतिसाद दिला नाही .अधीक्षकाचा फोन सतत येऊ लागल्याने तिने हा फोन नंबर ब्लॉक केला . त्यानंतर अधिक्षिकांनी इतर तीन फोननंबर वरून तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ते फोनही ब्लॉक केले . यात जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी गेला.
बालगृहातील तत्कालीन समुपदेशक जयगावकर ही २४ जून २५ रोजी सकाळी १० चा सुमारास कथीत पीडीतेला मिनिटभर बोलली. तेव्हा आजोबाच्या आजारपणामुळे मी येऊ शकले नाही पण लवकरच मी येते असं ती बोलली . २८ जून २५ ला सकाळी ८च्या सुमारास जयगावकर तिच्याशी बोलली . तोच संवाद झाला. २९ जून २५ रोजी पुन्हा दुपारी १:३० चा सुमारास जयगावकर तिच्याशी बोलली . तू येतो म्हणून का येत नाहीस,असा प्रश्न केला तेव्हा, मी लवकरच येते असे तिनं सांगितलं . १ जुलै ते ७ जुलै २५ या काळात जयगावकरने तिला वारंवार फोन केले .त्याला प्रतिसाद मिळायचा नाही . मात्र त्या नंबरवरून नंतर मिसकॉल येत. देवगावकर त्या नंबरवर परत फोन करायची तेव्हा रिंग जायची पण फोन उचलला जायचा नाही.
घटनाक्रम ४)
१६ जुलै २५ रोजी मी लातूर मधील मुक्तरंग प्रकाशनचे काम संपवून मुक्कामी हासेगाव येथील सेवालयात आलो . १९ जुलै २५ च्या सकाळी ९ वाजे पर्यंत मी सेवालयावरील सेवाघर इथे रवी बापटले यांच्यासोबत होतो . १७ किंवा १८ जुलै २५ ची ही घटना आहे . रवी बापटले यांनी माझ्या समोर कथीत पीडीतेच्या आजीला फोन लावला .फोनची रिंग वाजू लागल्यावर त्यांनी स्पिकर ऑन केला . त्यामुळे ते संभाषण मला मला ऐकता आले . रवी थोडंस रागावून बोलत होते , तुम्हाला वारंवार फोन करूनही तुम्ही फोन का उचलत नाहीत , तिच्या गोळ्या तेव्हाच संपल्या आहेत, तुमचा तिला मारायचा हेतू आहे का ? तुम्हाला गोळ्यांचं महत्त्व कसं कळत नाही ?
त्यावर आजीने जोरदार उत्तर दिले. मरायचं तर मरू द्या , तुम्हाला तिची लईच काळजी हाय का?.. आमचं आम्ही बघून घेऊ..
यावर रवी बोलले ,ती तुमच्याकडे असली तरी कायद्याने आमच्या बालगृहात आहे . तुम्हाला ती इथे नको असेल तर,समितीकडे अर्ज करून रीतसर तिला घेऊन जा,आमचा विरोध नाही…पण विनाकारण असा त्रास आम्हाला देऊ नका.त्यावर आजीने , येताव दोन दिवसात ..असं उत्तर दिलं .
फोन बंद झाल्यावर,मी रवीशी काय प्रकरण आहे अशी विचारणा केली.तेव्हा त्यांनी ,आठवडाभराची सुटी घेऊन गेलेली ही मुलगी परत येण्यास कशी टाळाटाळ करतेय, तिनं लग्न केल्याचं कळतयं…हा विषय डोक्याला ताप झालाय,असंही ते उद्वेगाने बोलले.
घटनाक्रम ५)
२१ जुलै २००५ रोजी दुपारी १२च्या सुमारास ज्ञानसागर विद्यालय हासेगावच्या मुख्याध्यापकांनी सेवालयाचे अध्यक्ष रवी बापटले यांना फोन केला की, सेवालय बालगृहातील एक मुलगी,तिची आजी व मामा टी .सी.मागण्यासाठी शाळेत आलेत, काय करायचं ?
रवी यांनी त्यांना सेवालयात पाठवण्यास सांगितले.लगेच १२-४० ला ती मुलगी, आजी व मामा असे तिघेजण सेवालय कार्यालयात आले.तिथे संगणक सहाय्यक ओंकार जाधव हा काम करीत होता.आजीने ओंकारकडे बालगृहातील तिच्या नातीचे कागदपत्र देण्याची मागणी केली .त्याने संस्थेचे अध्यक्ष रवी बापटले यांना बोलावले.ते आले. या बालगृहातून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला बालकल्याण समितीकडे जावे लागेल ,असे सांगून रवीने आवश्यक माहिती व कागदपत्रे त्याना दिली . कार्यालय सोडण्यापूर्वी नियमाप्रमाणे त्या तिघांचा एकत्रित फोटो घेण्यात आला . त्यानंतर ते निघून गेले ते परत सेवालयात आलेले नाहीत.इथे मुद्दाम नोंदविण्याची बाब म्हणजे,पीडीतेचे मामा याआधी कधीच सेवालयावर आले नव्हते.
२२ जुलै २५ ला समितीच्या आदेशाने तिला सेवालय बालगृहातून मुक्त करण्यात आल्याचे सेवालयाला कळले.सेवालयाच्या दृष्टीने हा विषय संपला होता .
घटनाक्रम ६)
२३ जुलै २५ ला बालकल्याण समिती धाराशिव यांच्याकडे या कथीत पीडीतेने सेवालय बालगृहात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची व तिला सेवालयामधून गोळ्या देण्यात येत नसल्याची तक्रार केली.अर्थात ही तक्रार तिला कोणीतरी लिहून दिलीय.लातूर बालकल्याण समितीतील एक महिला सदस्या ही सगळी सुत्रं हलवत होती,असा आरोप सेवालयाच्या वकीलांनी थेट न्यायालयात केलाय.धाराशिव समितीने सेवालय संदर्भात कसलीही माहिती न घेता,ठरल्याप्रमाणे ही तक्रार धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस स्टेशनला पाठवली.ढोकी पोलिसांनीही अतिघाई करीत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.सेवालय
बालगृह लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येत असल्याने ,तो गुन्हा औसा पोलिस स्टेशनला वर्ग केला . २५ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास औसा पोलीस स्टेशनचे पोलीस व अधिकारी पोलिस गाडीत,त्यांच्या ड्रेसवर सेवालयावर आले.असं होऊ शकण्याची शक्यता रवी बापटले यांच्यासह दोघा- तिघांनाच होती.त्यामुळं सेवालयावर भीतीचं वातावरण पसरलं.पोलिसांनी तक्रारीतील गंभीर आरोपांची कसलीही प्राथमिक चौकशी न करता, दुपारी साडे बाराच्या सुमारास रवी बापटले व इतरांना पोलीस गाडीत घेऊन गेले . सुमारे पाच तास त्या सर्वांना पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करून या सर्वांना कोठडीत टाकण्यात आले . पोलिसांच्या या वर्तनाकडे तटस्थपणे पाहिले तर,ते या कटात सहभागी आहेत, हे सहज लक्षात येते.
घटनाक्रम ७)
कथीत पीडीतेची सेवालय औषधे देत नसल्याची तक्रार ….व त्याबाबतची वस्तुस्थिती!
कथीत पीडीत अल्पवयीन बालिकेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे कि ,” गेल्या दोन महिन्यांपासून मी आजी व मामाकडे राहात आहे . एक महिन्यापासून माझ्या गोळ्या व औषधे संपल्याने ते विकत घेण्यासाठी मला ए आर टी कार्डाची आवश्यकता असते . वारंवार मागणी करूनही सेवालयाने ते कार्ड देण्यास नकार दिला . त्यामुळे माझ्या औषधांची व उपचाराची सोय करण्याची विनंती करण्यासाठी मी बालकल्याण समिती धाराशीव यांच्याकडे हजर झाले . “
हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याची माहिती बालकल्याण समिती धाराशिव आणि बालकल्याण समिती लातूरच्या सदस्यांना होती. एआरटी कार्ड देण्याची,वर्ग करण्याची नियमावली त्यांना माहिती आहे.एआरटीची औषधे घेणारी व्यक्ती स्वत: बालगृहात जाऊन ही मागणी केल्याशिवाय व तिने हे बालगृह ,समितीच्या आदेशाने अधिकृतपणे सोडल्याशिवाय,हे एआरटी कार्ड देता येत नाही. एआरटी ची नेमकी तिच औषधे बाजारात विकत मिळत नाहीत. ती शासकीय रूग्णालयातच घ्यावी लागतात व म़फत मिळतात.ही माहिती समितीच्या सदस्यांना नसेल, यावर कोण विश्वास ठेवेल? मुठभर लोक सोडले तर, हे सामान्य जनतेला माहिती नाही. लोकांची दिशाभूल करून,पीडितेला खोटी सहानुभूती मिळवून देण्यासाठी हा आरोप जाणीवपूर्वक कोण करायला लावलाय? अल्पवयीन मुलीला असं षडयंत्र रचणं शक्य नाही.
जी बाब सेवालय बालगृहाच्या अधिकारातच नाही, त्याचा दोष त्यांना कसा देणार? हा आरोप खोटा असल्याची खात्री असतानाही, बालकल्याण समिती लातुरच्या कोणत्या सदस्यांनी औसा पोलिसात जाण्याची तत्परता दाखवली? आतापर्यंत अनेकवेळा हे सदस्य सेवालय बालगृहात येऊन गेलेले आहेत.रवी बापटले यांचं जगणं,त्याग,काम सगळं काही त्यांनी जवळून पाहिलयं.तरीही अतिजलदगतीने त्यांनी औसा पोलिसात जाऊन तक्रारीला दुजोरा दिला. सुत्र हलवली आणि पुढच्या सगळ्या तमाशात सहभागी झाले.हा सगळा घटनाक्रम स्पष्टपणे सांगतो की,बालकल्याण समिती धाराशिव व लातुरचे काही सदस्य या कट कारस्थानात सहभागी आहेत.
पीडीतीने आजारी आजोबाला भेटण्यासाठी म्हणून सुट्टी घेऊन गेल्यानंतर, आजपर्यंत स्वत:हून एकदाही फोन केलेला नाही. याउलट सेवालयातून केलेल्या अनेक फोनला तिने प्रतिसाद दिला नाही,हे वास्तव दर्शवणारे सगळे पुरावे वर दिलेच आहेत.
घटनाक्रम ८)
ही माहिती पोलिस तपासात नोंदवली गेलीय की नाही, याची मला माहिती नाही. मात्र पीडीतेच्या वर्गमैत्रिणीनी मला जी धक्कादायक माहिती दिलीय,तिची तपास यंत्रणेने खातरजमा करून,ती माहिती न्यायालयासमोर ठेवणे गरजेचे आहे.
कथीत पीडीत मुलगी सेवालय बालगृहात राहू लागल्यानंतर एके दिवशी,तिने तिच्या वर्गमैत्रिणीला विनंती केली की,तिच्या वहीत लिहिलेले मोबाईल नंबर मला एका कागदावर लिहून दे.मैत्रिणीने तू का लिहित नाहीस असं विचारल्यानंतर,माझं अक्षर खराब आहे, असं ती बोलली.त्याप्रमाणे मैत्रिणीने तिने सांगितलेले नंबर त्या कागदावर उतरवले .ते नंबर धाराशिव जिल्ह्यातील तिच्या नातेवाईक व परिचितांचे असल्याचे तिने सांगितले . ती बाहेर गेली.थोड्या वेळानंतर पीडीतेने परत मैत्रिणीला बोलावून ,त्या कागदावर लिहिलेल्या नंबरवरील तिच्या मामाच्या मुलाच्या नंबरसमोर (My husband) माय हजबंड ,असं लिहिण्यास सागितले . त्या मुलीने तिच्या जवळच्या काळ्या शाईच्या पेनने तो शब्द लिहिलाय.
मी त्या मुलीशी बोलून याची खात्री करून घेतलीय . ही मुलगी कोणासमोरही हे सत्य सांगण्यास तयार आहे .
तिच्या वर्ग मैत्रिणींनी मला सांगीतलयं की, पीडीतेचे तिच्या मामाच्या मुलावर प्रेम असल्याचे अनेकदा बोललीय. बऱ्याचदा शाळेतून चोरून,गुपचूप बाहेर जाऊन ती त्याला भेटायची. तो मुलगा निगेटिव्ह होता पण माझ्याशी संबंध ठेवल्याने तो पॉजिटीव्ह झालाय . त्यामुळं मी त्याच्याशीच लग्न करणार आहे,असंही ती बोलायची, हि माहिती या प्रकरणात अतिशय महत्त्वाची आहे .
घटनाक्रम ९ )
१४ मे २०२५ रोजी आपली आजी व मामा सोबत ती पीडीता सेवालयातून गेली. त्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे २० मे २५ रोजी सायंकाळी, धाराशिव जवळील एका गावात मामाच्या मुलासोबत तिचा विवाह झाल्याची अतिविश्वसनीय माहिती माझ्याकडे आहे .संक्रमित अल्पवयीन बालिकेचा हा विवाह कायदेशीर गुन्हा असल्याने, भीतीपोटी या संबधात बोलायला कोणीही तयार नाही.याचा शोध पोलिसांनी घेतल्यास, सत्य समोर यायला वेळ लागणार नाही.
विशेष नोंद : आम्ही सेवक संस्थेने , सेवालयातील कथीत लैंगिक प्रकरण हे कसे कट कारस्थान आहे.त्याचा मुख्य सुत्रधार कोण आहे? हे कसं घडवलं गेलं? यातील सहभागी लोकांची नावं,असं निवेदन पुराव्यासह, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान ते जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अशा २२जणांना ईमेल व पोष्टाने पाठवले आहेच. त्याशिवाय मी केलेले हे सत्यशोधन वेगळे आहे.
महारुद्र मंगनाळे
अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार

