
लातूर : नागपूर जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या शिक्षण भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने एसआयटी नेमून तपास सुरू केला आहे. या चौकशीच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यामध्ये देखील संबंधित प्रमाणपत्र धारकांवर एसआयटीच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन देताना युवासेना जिल्हा प्रमुख ॲड. राहुल मातोळकर, शिवसेना तालुकाप्रमुख (शिरूर अनंतपाळ) भागवत वंगे, युवासेना चिटणीस (लातूर) खंडू गोविंदराव जगताप, युवासेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख नागेश्वर कापसे, युवासेना शहर चिटणीस अमित हांडे-पाटील, युवासेना शहर समन्वयक अभिषेक जगताप अभि, सागर जाजनुरकर, उपशहर प्रमुख शशिकांत इर्ले, इरफान शेख, बंटी गायकवाड आदी उपस्थित होते.
युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्ह्यात शिक्षण भरती प्रक्रियेत जर कुणी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असेल तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांच्या न्यायासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
