
‘सत्गुरू स्वर पुष्पार्पण’ सोहळ्यात आरोहच्या शिष्यांनी अर्पिली सांगितिक गुरुदक्षिणा…
लातूर: दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी, लातूर येथील आरोह संगीत अकादमीतील शिष्य परिवाराच्यावतीने गुरूंप्रति असणारी श्रद्धा,आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन दिवसीय ‘सत्गुरु स्वर पुष्पार्पण’ सोहळ्याचे आयोजन केले होते. यानिमित्ताने गुरूंनी सर्व शिष्यांवर केलेले संस्कार, दिलेलं सांगितिक ज्ञान आणि जीवनविषयक दृष्टी यासाठी सांगितिक गुरुदक्षिणा रागदारी संगीत गाऊन शिष्यांतर्फे अर्पण केली जाते.

आरोह संगीत अकादमी, लातूर येथील शिष्यांचे आदरणीय गुरुवर्य प्रा. श्री. शशिकांत देशमुख व डॉ.सौ. वृषाली देशमुख यांना हे स्वरपुष्प अर्पिले जाते. जवळपास १९ ते २० तास चाललेल्या या सांगितिक स्वरयज्ञामध्ये ७१ संगीत साधकांचे रागदारी सादरीकरण संपन्न झाले.
या सोहळ्याच्या प्रथम सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्री.प्राणेशजी पोरे गुरुजी, श्री. अभय शहा व श्री.आकाश राठी हे उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून श्री. किरण भावठाणकर, श्री. संजय सुवर्णकार, प्रा. हरीसर्वोत्तम जोशी व डॉ. रविराज पोरे यांनीही उपस्थिती दर्शविली.

यानिमित्त आदरणीय गुरुवर्य प्राणेशजी पोरे गुरुजी यांचे प्रा. श्री. शशिकांत देशमुख व डॉ.सौ. वृषाली देशमुख यांनी गुरुपूजन केले. त्यावेळी कु.शर्वरी डोंगरे,कु. सायली टाक, कु. उन्नती मुंडे व कु.रिदम पाटील यांनी गुरुस्तवणाचे गायन केले. याप्रसंगी आदरणीय गुरुजींनी शिष्य परिवाराला उद्देशून आशीर्वादरूपी मनोगत व्यक्त केले. प्रथम सत्राची सांगता लातूर मधील ज्येष्ठ गायक संगीत तज्ञ श्री. किरण भावठाणकर यांच्या गायनाने झाली.
द्वितीय सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शोभा जाधव, श्री. किरण भावठाणकर व श्री. संजय सुवर्णकार तसेच विशेष निमंत्रित म्हणून डॉ. अजित जगताप उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती शोभा जाधव तसेच श्री. किरण भावठाणकर यांनी शिष्यगणांना उपदेशपर मनोगत व्यक्त केले. त्या नंतर आदरणीय गुरुवर्य प्रा. श्री. शशिकांत देशमुख व देशमुख यांचे सर्व शिष्यगणांमार्फत गुरुपूजन संपन्न झाले. गुरुपूजनावेळी कु. सायली टाक, कु. रिदम पाटील, कु. उन्नती मुंडे आणि कु. शांभवी देशपांडे यांनी गुरुस्तवन गायले.
आरोह संगीत अकादमी मध्ये रागदारी संगीताचे धडे दिले जातात. स्वर पुष्पार्पण सोहळ्यात बाल संगीत साधकांपासून ज्येष्ठ संगीत साधकांपर्यंत सर्वांनी रागदारी संगीत सादर केले. भैरव, दुर्गा, खमाज, काफी, बागेश्री, बिहाग, यमन , मारू बिहाग व मधुवंती अशा विविध रागांचे गायन या दिवशी संगीत साधकांनी केले. यांना कु.भक्ती पाटील, श्री. दत्ता पाटील, श्री. महेश काकनाळे यांनी संवादिनीची साथ दिली. तसेच चि. समिहन जोशी, चि. वेदांत आडसकर व चि. विघ्नेश जोशी यांनी तबल्याची साथसंगत केली.
प्रतिवर्षी दिला जाणारा शिष्योत्तम पुरस्कार यावर्षी कु. आराध्या कदम व कु. कादंबरी कासलबादे या गुणी संगीत साधकांना गुरूंच्या हस्ते देण्यात आला. द्वितीय सत्राची सांगता गुरुवर्य डॉ. वृषाली देशमुख यांच्या गायनाने करण्यात झाली.
रसिक श्रोत्यांच्या व पालकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला..
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरोह परिवारातील संगीत साधक वेणू कुलकर्णी व रामेश्वरी दिवाण यांनी आपल्या गोड वाणी मधून अतिशय समर्पक असे केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोह परिवारातील सर्व संगीत साधकांनी परिश्रम घेतले.

