
निलंगा : स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजे आणि अखंड प्रेरणास्थान असलेल्या यांच्या जयंतीनिमित्त निलंगा शहरात सामाजिक बांधिलकीचा आणि सेवाभावाचा सुंदर अविष्कार पाहायला मिळाला. डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या वतीने शहरातील विविध भागात लाडू वाटप करून शिवप्रेमाचा आणि सामाजिक एकात्मतेचा गोड संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

शिवरायांच्या विचारांचा वारसा केवळ घोषणांमधून नव्हे, तर कृतीतून जपण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. लाडू वाटपाच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी रामलिंग पटसाळगे, गोविंद सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड, दत्ता शिंदे, सुधीर पडसाळगे, अविनाश सूर्यवंशी, रमेश पडसाळगे, शुभम सूर्यवंशी यांच्यासह सेवा कुंडचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा कुंडच्या वतीने निलंगा शहरापुरतेच मर्यादित न राहता जिल्ह्यातील जळकोट, देवणी आणि परिसरातील भागांमध्येही शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये जनजागृती, प्रसाद वाटप आणि शिवचरित्रातून प्रेरणा देणारे कार्यक्रम घेऊन युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव जागविण्याचे कार्य करण्यात आले.

शिवजयंतीच्या निमित्ताने सेवा कुंडने राबविलेल्या या उपक्रमातून समाजात बंधुभाव, सेवाभाव आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. शिवरायांचा आदर्श केवळ इतिहासापुरता मर्यादित न ठेवता तो वर्तमानात जगण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

