

लातूर मधील काही संगीतप्रेमी व संगीत साधकांनी एकत्र येऊन अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी दर महिन्याला एक संगीत सभा घेण्याचा संकल्प केला, तसे पाहिले तर आताच्या काळात हे प्रवाहा विरुद्ध कार्य होते आणि या कार्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक अडचणी येत होत्या परंतु या सर्व अडचणींवर मात करून आज या मासिक संगीत सभेने अखंडितपणे आपले 120 वे आवर्तने पूर्ण करत एक वेगळाच इतिहास लातूरच्या मातीमध्ये रचला आहे. आणि आज या मासिक संगीत सभेच्या संस्था स्थापनेच्या दशकपूर्ती निमीत्त शानदार संगीत समारोहाचे आयोजन केले आहे.
आज दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ : ३० वाजता दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी संपन्न होणाऱ्या दशकपूर्ती संगीत समारोहामध्ये कोलकाता येथील विश्वविख्यात महिला तबलावादक विदुषी रिंपा शिवा यांच्या स्वतंत्र तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे, त्यांना संवादिनीवर लहरा साथ योगेश रामदास करणार आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही 120 मासिक संगीत सभा नुकतेच निधन झालेले जगविख्यात तबलावादक स्वर्गीय उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित होत आहे या निमित्ताने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लातूरमधील जवळपास 40 ते 50 तबलावादक सामूहिक तबला वादन करून उस्तादांच्या स्मृतीस ताल समर्पण करणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते होणार असून दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, लातूर मधील ज्येष्ठ तबलावादक तालमणी पंडित राम बोरगावकर व विश्व ट्रॅव्हल्सचे सुनील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे व या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा व इतर अनेक ठिकाणातून रसिक मोठ्या संख्येने येणार आहेत.
आज दशकपूर्ती निमित्त ताल समर्पण या कार्यक्रमासाठी लातूरमधील व परिसरातील सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आवर्तन, अष्टविनायक प्रतिष्ठान तसेच दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.

