

ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे, सबंध साहित्य रसिक ज्यांना रा. रं. बोराडे म्हणून ओळखतो, यांचे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
२५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव या लहानशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बोराडे यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले. त्यांच्या लेखनात गावांचे परिवर्तन, कृषी जीवनाचे संघर्ष, आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकसित होत असलेल्या सामाजिक-आर्थिक स्थितींचे स्पष्ट चित्रण आढळते.
१९५७ साली, इयत्ता दहावीत असताना, त्यांनी ‘वसुली’ ही कथा लिहिली, ज्याला दैनिक ‘सकाळ’ आयोजित कथास्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘पाचोळा’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली, ज्यात ग्रामीण जीवनाचे वेगळे दर्शन घडविले, यानंतर त्यांना पाचोळाकार म्हणून महाराष्ट्रभर संबोधते जावू लागले. त्यांनी लिहिलेल्या आमदार सौभाग्यवती या कादंबरी वरती आधारित नाटक सर्वत्र गाजलं मराठी नाटकांमध्ये मराठवाड्यातील साहित्यिकाने लिहिलेल्या कादंबरी वरती व्यावसायिक नाटक उभारल्याची त्या काळातील ही पहिलीच घटना होय.
बोराडे यांच्या लेखनशैलीत साधेपणा आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली होती. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असे, ज्यामुळे वाचक स्तंभित होत. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात, ज्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळी उंची प्राप्त झाली.
रा. रं. बोराडे यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वात एक अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची आठवण सदैव आपल्या मनात राहील. मराठवाड्यातील ग्रामीण साहित्याचा आत्मा असणाऱ्या या साहित्यिकाला भावपूर्ण श्रद्धांजली…
– दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र , लातूर

