

लातूर: पिवळसर रंगाने माखलेला अन् डोक्याला राखाडी रंगाची ठेवण असलेला हिवाळ्यात हिमालयातून उत्तर आणि मध्य भारतात स्थलांतर करणारा इवलासा पक्षी म्हणजे “राखी डोक्याची पिवळी माशीमार” पक्षी. कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेलो आणि तेथील माझे मित्र वन्यजीवप्रेमी दिनेश तांबट सर आणि वसीम कादरी आम्ही या दुर्मिळ दिसणाऱ्या पक्षाच्या शोधात शहरालगत असलेल्या झाडीमध्ये फिरत होतो. पहिल्या दिवशी काही याचे दर्शन झाले नाही. मात्र दोन दिवसांनी पुन्हा या पक्षाचे सौंदर्य मला खुणावत होते. आणि शेवटी आमची प्रतीक्षा संपली समोरच एका आंब्याच्या झाडावर चार राखी डोक्याची पिवळी माशीमार पक्षी दिसले त्यांचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. अगदी छोटा आणि दिसायला सुंदर असा हा पक्षी पाहून समाधान झाले. या पक्षाबद्दल काही अधिकची माहिती डॉ राजू कसंबे सरांच्या “महाराष्ट्रातील पक्षी” या ईबुक वरून खालीलप्रमाणे पोस्ट करत आहे.
नाव: राखी डोक्याची पिवळी माशीमार
इंग्रजी नाव: Grey-headed Canary-flycatcher
शास्त्रीय नाव: Culicicapa ceylonensis
लांबी: 13 सेंमी.
आकार: चिमणीपेक्षा छोटा.
ओळख: ताठ बसायची सवय. डोके व छाती राखी. पाठ हिरवट. पोटापासून खालची बाजू पिवळी.
आवाज: उंच पट्टीतला वारंवार केलेला जोरकस ‘चिक-व्हीची-व्हीची’.
आढळ: स्थलांतरित. मराठवाडा तसेच दख्खनचा कमी पावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रात सर्वत्र नोंदी. पुणे, औरंगाबाद, तसेच अहमदनगर (1876) येथे जुन्या नोंदी.
अधिवास: जंगले तसेच झाडीचे प्रदेश.
खाद्य: उडणारे छोटे कीटक.
स्थानिक नाव: राखी डोक्याची लिटकुरी.
वीण: एप्रिल ते जून (हिमालय).
– माहिती संकलन आणि छायाचित्र : धनंजय गुट्टे लातूर

