
लातूर: राजनंदा विद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मराठीला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, अभिजात भाषा म्हणजे काय?, अभिजात दर्जा मिळण्यासाठी भाषा किती जुनी असावी लागते?, तसेच या संदर्भात कोणते ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय पुरावे देण्यात आले? या विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. शिवराज कोळगे होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुस्मिता सगरे यांनी स्वागत करत शाळेतील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.


या वेळी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेबद्दल आणि तिच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला.

