
लातूर, – केंद्र सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडीया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा संकुल येथे सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, नायब तहसीलदार एस. एस. उगले यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, सायकलिस्ट क्लबचे सदस्य, नागरिक यावेळी उपस्थित होते.
निरोगी राष्ट्राच्या उभारणीत नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळांचे महत्व जनतेला पटवून देण्यासाठी ‘संडे ऑन सायकल’ ही मोहिम राबविण्यात आली. यानिमित्त आयोजित सायकल रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजीव गांधी चौक, छत्रपती चौक, पीव्हीआर चौक, संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

