महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून महाराष्ट्रातील नामांकित समाजसेवकांसोबत लातूर जिल्ह्यातील माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर प्रकल्पाचे प्रमुख शरद केशवराव झरे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार शरद झरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा कळंब येथे २३ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शरद झरे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण चळवळ तसेच शिक्षणापासून वंचित मुलांसाठी भरीव असे योगदान दिले आहे. लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून पहिली वृक्षारोपण चळवळ राबवून जिल्ह्यात पाच लक्ष वृक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सध्या माझं घर प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील शिक्षणापासून वंचित मुलामुलींचा सांभाळ ते करत आहेत. महात्मा गांधीच्या नई तालीम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या प्रकल्पात मुलांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शरद झरे स्वावलंबनाचे धडे शिकवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.

