
इतिहास साक्षी आहे की कोणत्याही क्रांतीचा पाया हा शब्दांवरच रचला गेला आहे. एका ठिकाणी उच्चारलेला शब्द आणि एका कागदावर लिहिलेले विचार कधी संपूर्ण समाजाला बदलून टाकतात, हे आपण वारंवार पाहिले आहे. तलवारींनी लढाया जिंकता येतात, परंतु परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी विचारांची गरज असते, आणि हे विचार घडतात लेखनातून, वाचनातून आणि विचारमंथनातून.
इतिहासातील क्रांती आणि लेखनाचा प्रभाव
जगातील प्रत्येक सामाजिक आणि राजकीय क्रांतीमागे एखादा लेखक, एखादा विचारवंत किंवा एखादे प्रभावी पुस्तक आहे.
- अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला थॉमस पेन यांच्या Common Sense या छोट्याशा पुस्तिकेने दिशा दिली.
- फ्रेंच राज्यक्रांतीच्या मागे जीन-जॅक रूसो, माँटेस्क्यू आणि वोल्टेअर यांच्या विचारांचा प्रभाव होता.
- भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळींना जोतीराव फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांच्या लेखनाने आकार दिला.
- भगतसिंग, नेहरू, बोस यांच्यावरही कम्युनिस्ट विचारसरणी, समाजवाद आणि स्वातंत्र्याच्या संकल्पना यांचा प्रभाव होता, जो त्यांना लेखनातून मिळाला.

शब्द, लेखन आणि क्रांती यांचे नाते
लेखन हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. लेखणीच्या माध्यमातून विचार निर्माण होतात, विचारांमधून जागृती होते आणि जागृतीमधून क्रांती जन्माला येते. ज्या समाजात लोक विचार करू लागतात, त्या समाजाचा कोणताही शासनप्रणाली किंवा सत्ता जास्त काळ दडपशाही करू शकत नाही.
आज ज्या व्यक्ती सोशल मीडियावर किंवा लेखनाकडे दुर्लक्ष करतात, त्यांनी लक्षात घ्यावे की –
- शब्द लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांना विचार करायला लावतात.
- शब्द क्रांती घडवतात, शासन व्यवस्थेला हादरवतात.
- शब्द विचारांच्या लाटेचा पाया रचतात आणि बदल अटळ करतात.
आजच्या काळात लेखनाची गरज का आहे?
आजपर्यंत जितक्या सामाजिक चळवळी झाल्या, त्या मोठ्या प्रमाणात लिखित शब्दांवर अवलंबून होत्या. पूर्वी छापील माध्यम होते, आज डिजिटल माध्यमे आहेत. ज्या काळात छापील माध्यम मर्यादित लोकांपर्यंत पोहोचत होते, तेव्हा लेखनाने क्रांती घडवल्या, मग आजच्या काळात तर प्रत्येक हातात मोबाईल आहे, त्यामुळे लेखनाचे सामर्थ्य अजूनच वाढले आहे.
- आज एखाद्या विषयावर समाज माध्यमांवर पोस्ट लिहिली तर ती काही सेकंदांत हजारो लोकांपर्यंत पोहोचते.
- पत्रकारिता, ब्लॉगिंग, सोशल मीडिया, संशोधनपर लेखन यांच्या माध्यमातून विचार जनमानसात रुजवले जाऊ शकतात.
- लेखनाने केवळ सरकारवर दबावच नाही तर कायद्यामध्येही बदल शक्य होतात.
संघर्षाच्या पद्धती बदलल्या, पण संघर्ष संपले नाहीत
पूर्वीच्या काळात क्रांतीसाठी शस्त्र उचलावी लागत असत, आज संघर्षाचे मार्ग वेगळे झाले आहेत. आज केवळ मोठे मोर्चे काढून, रस्त्यावर उतरून मागण्या मान्य होत नाहीत, पण योग्य प्रकारचे लेखन, जनजागृती आणि याचिका (PIL) यांच्याद्वारे मोठे बदल घडवता येतात.
- समाजमाध्यमांवर सुरू झालेल्या चळवळींमुळे अनेक सरकारांना धोरणे बदलावी लागली.
- #MeToo, #BlackLivesMatter, #SaveAarey यांसारख्या चळवळी फक्त सोशल मीडियाच्या आणि लेखनाच्या जोरावर उभ्या राहिल्या आणि त्याचा मोठा परिणाम झाला.
- लोकशाहीसाठी पत्रकारिता आणि वैचारिक लेखन हे एक प्रभावी हत्यार ठरले आहे.

लेखन नसेल तर विचार मरतात!
समाजात विचार मरण्याचा अर्थ म्हणजे समाज मागे जाणे. जो समाज फक्त “दाखवले जाते ते” पाहतो आणि “सांगितले जाते ते” ऐकतो, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच विचार करणाऱ्या, परिवर्तनाची आस असणाऱ्या प्रत्येकाने लेखन करायला हवे… जोपर्यंत अखाद्य समस्या विषयी चर्चा घडवून येणार नाही अर्थातच त्या समस्येवर प्रकाराचे शब्द बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत लोकांना आपल्या समस्या आंदोलनामार्फत किंवा कुठल्याही निवेदना मार्फत प्रशासनापर्यंत अथवा ते सोडवणाऱ्या माध्यमातून नेण्याची ताकद हे केवळ शब्दांमध्ये आहे त्यामुळे शब्द हे शस्त्र आहे ते उचलायला लिहायला आणि पेलायला शिका…
- दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र,जिल्हा प्रतिनिधी दूरदर्शन,लातूर cell 7722075999

