
लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक
माझं लातूर परिवाराच्या निवेदनाची दखल
लातूर दि. २१ मार्च २०२५ : लातूर शहराला भेडसावणाऱ्या नागरी समस्या दूर कराव्यात यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांना निवेदन देण्यात आले होते याची दखल घेत समस्येची दखल घेत मंत्रालयातील त्यांच्या दालनात दिनांक २१ मार्च २०२५ रोजी बैठक घेतली. या ऑनलाईन बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून दूषित पाण्याची समस्या तत्काळ सोडवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले.
लातूर जिल्हा रुग्णालय, लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा, वाहतूक समस्या तसेच स्वच्छता व्यवस्थेच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी लातूर शहराच्या नागरी समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
लातूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की, यंदा पाऊस चांगला झाल्याने सध्या कोणतीही पाणीटंचाई नाही. यावर बोलताना दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आल्या आहेत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिकेला रिकाम्या प्लॉट्समध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. गो ग्रीन गॅलरी, रूफ वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे उपक्रम राबवले जात असून सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी सेप्टिक टॅंक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
शहरातील वाढती वाहतूक आणि मुख्य चौकातील कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन रिंग रोडचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले गेले. शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त नियोजन करावे असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासोबतच बस स्थानकाच्या विस्तारासाठी आणि नवीन पर्याय शोधण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवकाळी पावसामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी, पूर्वसूचना यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांच्यासह माझं लातूर टास्क फोर्सचे सदस्य हे ऑनलाइन उपस्थित होते.

