
हा ताम्रपट तत्कालीन राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती व इतिहास समजण्यास उपयुक्त.

बावची येथे श्री प्रकाश जाधव यांच्या संग्रही ४ पत्र्यांचा मोडी ताम्रपट त्याच्या घराण्याचा आहे. जेंव्हा केंद्रीय पुरातत्त्व चे सर्वेक्षण मध्ये तो त्यांनी डॉ. नंदकिशोर विजपुरिया व सचिन पवार यांना दाखवला. पुढे चालून त्यावर जिल्ह्यातीलच संशोधक कृष्णा गुडदे यांनी संशोधन करून त्याचा खुलासा केला आहे.

या ताम्रपटच्या पहिल्या पानावर विजापूरचा आली आदिल शाह ( दुसरा कारकीर्द इ.स. १६५६ ते १६७२) व तालुका बर्दापुर च्या काजी यांचे शिक्के तर आनंदराव गोविंद देशपांडे व व्यंकटराव देशमुख परगणा बर्दापुर यांच्या सह्या आहेत.




विषय असा की मौजे बावची चे संभाजी नागोजी कासार (जैन) हे पाटील होते मात्र ५ – ७ वर्ष झाले सरकार दरबारी त्यांच्या कडून महसूल जमा झाला नव्हता. लावणी पडली होती, गाव परागंदा झाला होता. त्यामुळे जमीनदार याने कासार पाटील यास विजापूर दरबारी हजर केले. त्यावर बादशाहनी गावची उस्तवारी(हिशोब) करून महसूल जमा करावयास सांगितला. ठरवून दिल्या प्रमाणे ११०० होन चार महिन्यात द्यायचे कबूल करून कासार पाटील गावी आले. शेतसारा वसूल करण्यासाठी पाटलाने गावावर पट्टी बसविली. मात्र लोक हाताशी लागेनात. तेंव्हा व्याकूळ होऊन ते देशमुख व देशपांडे याच्या कडे गळा पडले. (मदती साठी विवंचना केली). जमीनदार यांच्या गळा पडले. जमीनदार बोलले की आम्हाला काही तुमच्या वतनाची गरज नाही तुम्ही दुसऱ्या कोणास तरी देणे. मग पाटील पेचात पडले. परत एक वेळ जमीनदार याने पाटलास दरबारात हजर केले. त्यावेळेस बादशाह हे पाटलास अदबयात(वाईट, टाकून, कठोर बोलणे) करू लागले. पाटलांस ते त्रास सहन झाले नाही. तो पैसा त्याच्यावर पडला. त्यांनी त्यांच्या भाऊबंदास बाजिंद होऊन विवंचना केली की या संकट समई आम्हास सामील व्हा, भाऊबंद बोलले की आम्हास वतनाची गरज नाही, तुम्ही तुम्हास कळेल तसे करणे. तेंव्हा कासार पाटील यांची आपली पाटीलकी विक्रीस घातली. इतक्यात त्यांना वर्तमान कळले की राजश्री सबाजी जाधव यांना वतनाची गरज आहे. सबाजी जाधव हे बादशाह पाशी मनसदारी करीत होते. तेंव्हा कासार पाटील जाऊन त्यांच्या गळा पडले. या वेळेस गोष्ट आमच्या जीवावर आली आहे, आम्हास जीवनदान द्या. यावर राजश्री सबाजी जाधव बोलले की जमीनदार यासाठी तयार असल्यास आम्ही अंगीकार करू. विद्यमान जमीनदार बोलले की हा पैसा चौगा वतनदार यांनी वाटून घ्यावा. त्यापैकी २५० होन घेऊन संभाजी नागोजी कासार पाटील यांनी राजश्री सबाजी जाधव यांना पाटीलकी विकली. बाकी कुलकर्णीपण, भाटपण, महारकी ही वतने ३ रुके प्रमाणे विकली.

यातच गावाचे सर्व मानपान विकून टाकली. त्यात कुलकर्णी पण, भाट पण, बीजामथा चावर, लखमादवीचा पसा, होलीचा माण, पाव पट से, रवल दाम, भवानी मान, रयाची घोंगडी, धनगराचा मागास घोंघाड, कोष्ट्याच्या मागास, पाल्याच तेल, पाल्यायचा गुल, सवासानीचा मान, रायाची मोली, हळद, राबता महार हे वतन व मानपान विकून टाकले.

त्यावर साक्ष गहाण घेतल्या. या मजहर वर साक्ष मध्ये बरदापूर(बर्दापूर)चे खंडोजी पाटील, गरसोड(गरसुळी)चे संभाजी पाटील, बिरगाव(बिटरगाव)चे येकाजी पाटील, वाकली(वाकडी)चे भुजंगराव पाटील, फुमसान(सुमठाणा)चे दरकोजी पाटील, बोरगाव(दर्जी बोरगाव)चे भगाजी पाटील, सेर(सेरा)चे हाणमंतराव पाटील, समसाना(समसापूर)चे पिराजी पाटील, मौजे निकव(निवाडा)चे सटवाजी पाटील, घनसरगावचे राणोजी पाटील यांची नावे आहेत. बावचीच्या बलुतेदार मध्ये साक्ष संभाजी सुतार, सटवाजी लव्हार, माणकोजी परीट, सिवाजी वारीक, राणोजी कुंभार, रायाजी चांभार यांची नावे आली आहेत. बावचीचे इतर पाटील (मोकदम) मध्ये येशवंतराव, दवलतराव, माणकोजी, नारायेणराव, हायेबतराव यांची नावे आली आहेत. तर नाईक मंडळींत सटवा नाईक, दवल नाईक, कस नाईक यांची नावे आली आहेत. अशा प्रकारे तत्कालीन ग्रामनामे, व्यक्तिनामे, तत्कालीन परिस्थिती यांवर प्रकाश टाकणारा हा ऐतिहासिक ताम्रपट खुप महत्वाचा आहे, असे यावेळी कृष्णा गुडदे यांनी सांगितले. कृष्णा गुडदे यांस यावेळी वाचनासाठी राधिका दाते तर संशोधन साठी डॉ. नंदकिशोर विजपुरिया व सचिन पवार यांचे सहकार्य झाले आहे.

