
लातूर दि.२५ दयानंद कला महाविद्यायात मागील तीन वर्षात जे विद्यार्थी संस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात उल्लेखनीय कार्य करतात तसेच शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘दयानंद श्री‘ व ‘दयानंद श्रीमती‘ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार आदिराज संदिपान जगदाळे व स्वरांजली महादेव पांचाळ यांना प्राप्त झाला आहे.

अधिराज जगदाळे याने मागील तीन वर्षांमध्ये दोन राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, दोन राष्ट्रीय युवा महोत्सव व एक राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याने राज्यस्तरावर अनेक पारितोषिके व विविध कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. याबरोबरच त्यांने अनेक युवकांना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये पोवाडा,कव्वाली,पाश्चात्य समूह गायन, भारतीय समूह गायन या स्पर्धांमधून अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत.
राज्याभिषेक सोहळा- ३५० निमित्ताने विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या पोवाडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. मिळालेली १००००/- रुपयांची धनराशी विद्यार्थी सहाय्यता निधीसाठी प्राचार्यांकडे सुपूर्त केली. सांस्कृतिक कार्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्याने विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे करीत असताना शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत ठेवला. चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी विषयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.

कु. स्वरांजली पांचाळ हिने अकरावीपासून ते एम.ए.पर्यंतचे शिक्षण दयानंद कला महाविद्यालयात पूर्ण केले. झी युवा सिंगर-एक नंबर या रियालिटी शोमध्ये तिने सहभाग नोंदवून महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये सुगम गायनामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्याचबरोबर कव्वाली, समूह पाश्चात्य गायन, भारतीय समूह गायन इत्यादी विविध कला प्रकारातून अनेक पारितोषिक प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

दयानंद कला महाविद्यालयातील अत्यंत बहुमानाचा हा पुरस्कार प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. रमेश पारवे, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संतोष पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. सुभाष कदम, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अशोक वाघमारे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. शिवकुमार राऊतराव, डॉ. गोपाल बाहेती, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास हे उपस्थित होते.

