
वीजयंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे महवितरणचे आवाहन
लातूर, ता. ३० मार्च: महावितरण प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही वीजयंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व तो जाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या दहा दिवसात रोहित्रा जवळ कचरा जाळल्याने रोहित्र जळून वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
शहरातील अनेक भागात नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. मोकळ्या जागी, मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांच्या जवळील कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रोहित्राला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवडयात सावेवाडी येथील रोहित्रास कचरा जाळल्यामुळे आग लागल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबर लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

नागरिकांनो, आग लागल्यास येथे करा संपर्क
नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास अग्निशमन दला सोबतच महावितरणच्या १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वारंवार आवाहन करूनही नागरिक रोहित्रा जवळ कचरा टाकून जाळण्याचे प्रकार दिसून येतात. यामुळे वीजयंत्रणेला मोठा फटका बसतो. पर्यायाने वीजग्राहकांनाही याची झळ सहन करावी लागते. रोहीत्रे उन्हाच्या तिव्रतेने गरम झालेले असतात. अशावेळी रोहीत्राजवळ कचरा जाळल्यास त्याची धग रोहीत्रास बसून रोहीत्राचे तापमान वाढल्याने प्रसंगी रोहीत्रास आग लागून रोहीत्र जळून जाते. परिणामी वीजपुरवठा खंडीत होतो. त्याचबरोबर रोहीत्राचा स्फोट झाल्यास गंभीर अपघातही होण्याची शक्यता असते.त्यामुळे वीजग्राहकांनी सजग राहून रोहीत्राजवळ कचरा टाकू नये अथवा कचरा टाकून जाळणाऱ्यास मज्जाव करावा.- ज्योती कुमठेकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

