
जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी एका महिलेसह चार जणांनी एकत्रित येऊन जादूटोणा, भानामतीचा प्रकार करीत अघोरी पूजा केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील पंढरपूर येथे समोर आला आहे. या प्रकरणी त्या महिलेसह चार जणांविरुद्ध देवणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील पंढरपूर येथे गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास विश्वनाथ चंदर कदम, तुकाराम रघुनाथ मुरुडकर व अनोळखी एक पुरुष व एक स्त्री जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी जादूटोणा, भानामती अशी अघोरी पूजा करत असल्याचे आढळून आले.

जमिनीत असलेले गुप्तधन काढून देण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. चारही जण बराच वेळापासून करणी-भानामतीसाठी लागणारे काही साहित्य घेऊन अघोरी पूजा मांडून काही तरी मंत्र, जप करीत होते. हा प्रकार भानामतीचा असल्याचे दिसून आल्याची तक्रार देवणी पोलिसात बालाजी शंकर भूरे यांनी दिली.
त्यानुसार देवणी पोलिसांत महिलेसह चार आरोपींवर कलम, ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक माणिकराव डोके हे करत आहेत.

