
लातूर शहर हादरवणारी धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा समोर आली आहे. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, तात्काळ त्यांना लातुरातील सह्याद्री हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेली माहिती :
सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हनुमंत किणीकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, “बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गोळी डोक्यातून आरपार गेलेली नाही, मात्र मेंदूच्या भागाला नुकसान पोहोचल्याने त्यांची स्थिती गंभीर होती. वेळेवर उपचार सुरू झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.”
प्राथमिक तपासात काय समोर येतंय?
ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनोहरे यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचा तपास प्रशासन व पोलीस करत आहेत.
लातूर शहरात खळबळ :
या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बाबासाहेब मनोहरे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अशा प्रकारच्या कृतीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील काय?
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. कुटुंबीय, सहकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चौकशी केली जात आहे.

