
लातूर | प्रतिनिधी
लातूर शहराची शैक्षणिक ओळख टिकवण्यासाठी आवाज उठवत मनसे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पोलिस प्रशासनावर थेट आणि गंभीर आरोप करत, शहरातील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संतोष नागरगोजेंनी केलेला आरोपांचा भडिमार सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्युशन एरियात नशेचे जाळे! गांधीनगरमध्ये खुलेआम गांजा विक्री?
नागरगोजे यांनी सांगितले की, लातूर शहरातील ट्युशन क्लासेसच्या परिसरात विविध अवैध नशेचे प्रकार वाढले आहेत. गांधीनगर भागात गांजा व नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असून, ‘आमदार’ नावाच्या पानपट्टीवरही याचे व्यवहार उघडपणे सुरु आहेत.
पोलीस ठाण्यासमोरच लॉटरी – कोण देतो आशीर्वाद?
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच २४ तास लॉटरीचे दुकान चालू आहेत. नागरगोजे म्हणाले, “पोलीस ठाण्याच्या समोर हे सुरू असताना पोलिसांना दिसत नाही का? की कुणाचा आशीर्वाद आहे?” हा सवाल उपस्थित करत त्यांनी थेट पोलीस यंत्रणेवरच अविश्वास व्यक्त केला.
एसपी ऑफिससमोर गुटख्याचा ठेकेदार – अद्याप कारवाई शून्य!
एसपी कार्यालयासमोर असलेल्या बोळात गुटखा व्यावसायिक राहतो, ही माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले. “गुटखा तयार करणाऱ्या मशिन्स जप्त झाल्यावर त्या कुठे गेल्या? याची माहिती पोलिसांकडे असली तरी ते गप्प का आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कर्नाटक सीमेवरील गोडाऊन – गुटख्याच्या गाड्या कशा येतात?
लातूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवरील अनेक गोडाऊनमधून गुटख्याच्या गाड्या लातूरमध्ये येतात. या संदर्भात नागरगोजे म्हणाले, “आमच्याकडे गाड्यांचे नंबर आहेत, पण पोलिसांची कारवाई कुठे आहे? पोलिसांनी आता तरी गप्प न राहता कारवाई केली पाहिजे.”
गृहमंत्र्यांची भेट – लातूर वाचवा, शिक्षणाचं माहेरघर अबाधित ठेवा
या साऱ्या प्रकारांना विरोध करत नागरगोजे यांनी सांगितले की, “लातूर हे शैक्षणिक शहर आहे आणि राहू द्या. इथे अशा अवैध गोष्टींचे साम्राज्य वाढू देणार नाही. लवकरच गृहमंत्र्यांची भेट घेऊन या साऱ्यांची माहिती देणार आहोत.”
त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून व्यक्त झालेली तीव्र भावना आणि ठाम आरोप सध्या लातूर पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या आरोपांवर पोलीस प्रशासन काय प्रतिक्रिया देते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमीसाठी संपर्क – newsroom@yutichakra.com
#Tags:# लातूर, #अवैध धंदे,# पोलिसांवर आरोप, #संतोष नागरगोजे, #मनसे किसान सेल, #लॉटरी, #गांजा, #गुटखा

