
मार्च महिन्यात साडेचार लाख वीजग्राहकांनी केला १४५ कोटींचा भरणा
लातूर, ता. ९ एप्रिल ( प्रतिनिधी): महावितरणच्या ऑनलाईन वीज भरण्याच्या हाकेला लातूर परिमंडळातील वीजग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या मार्च महिन्यात लातूर परिमंडलातील सुमारे चार लाख ६९ हजार ८९४ वीजग्राहकांनी १४५ कोटी १९ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन पध्दतीने भरले आहे. वीजबिलात मिळणारी सवलत आणि बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरणा सुविधेस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ऑनलाईन व गोग्रीन सुविधेचा लाभ घेतलेला नाही अशा ग्राहकांनी वीजबिल ऑनलाईन भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकाभिमूख पाऊल टाकत वीजग्राहकांसाठी मोबाईल ॲपसह विविध सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे वीजग्राहकही ऑनलाईन् वीजबील भरण्यास वाढती पसंती देत आहेत. महावितरणने संकेतस्थळावर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच बील भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डसह विविध मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने वीजबिल ऑनलाईन भरण्यास ग्राहक पसंती देत आहेत.
लातूर परिमंडलांतर्गत येणाऱ्या बीड, धाराशिव व लातूर जिल्हयातील ३ लाख ३३ हजार ६९५ वीजग्राहकांनी फेब्रुवारी महिन्यात ७१ कोटी ५६ लाख रूपयांच्या वीजबीलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील १ लाख ६३ हजार १४ वीजग्राहकांनी ३४ कोटी २३ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. तसेच बीड जिल्हयातील ९४ हजार ९४५ वीजग्राहकांनी २१ कोटी २३ लाख रूपयांचे वीजबील ऑनलाईन भरले आहे. तर धाराशिव जिल्हयातील ७५ हजार ७३६ वीजग्राहकांनी १६ कोटी १० लाख रूपयांचा वीजबील भरणा केल्याचा समावेश आहे. त्याचबरोबर हाच आलेख वाढत जावून मार्च महिन्यात ४ लाख ६९ हजार ८९४ वीजग्राहकांनी १४५ कोटी १९ लाख रूपयांच्या वीजबीलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील २ लाख ३३ हजार ५० वीजग्राहकांनी ७१ कोटी ६२ लाख रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. तसेच बीड जिल्हयातील १ लाख ३५ हजार २४३ वीजग्राहकांनी ४१ कोटी २१ लाख रूपयांचे वीजबील ऑनलाईन भरले आहे. तर धाराशिव जिल्हयातील १ लाख १ हजार ६०१ वीजग्राहकांनी ३२ कोटी ३५ लाख रूपयांचा वीजबील भरणा केल्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस वीजग्राहक वीजबील भरणा केंद्रासमोरील रांगा टाळत ऑनलाईन सेवेला प्राधान्य देत असल्याचे चित्र लातूर परिमंडळात दिसून येत आहे.
बिलात ०.२५ टक्के सूट
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास सेवा निःशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.
तात्काळ मिळते पोच
वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

