
लातूर | प्रतिनिधी
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, विचारक्रांतीचे जनक, आणि दलित, शोषित, वंचितांच्या हक्कांचे महान लढवय्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी अभिवादनाचे बॅनर्स आणि फलक झळकू लागले आहेत. मात्र, यंदा या उत्सवात एक गंभीर सामाजिक चर्चा होताना दिसत आहे – “डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या शेजारी स्वतःचा फोटो लावणे योग्य आहे का?”
सामाजिक जाणीव असलेले नागरिक आणि कार्यकर्ते यांचे एकमत:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची, त्यांचे योगदान आणि विचार इतके विशाल आहेत की, त्यांच्यासमोर कोणत्याही व्यक्तीचा फोटो झळकवणे ही अविचारित कृत्य ठरू शकते. सामाजिक चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हात जोडून विनंती केली आहे की –
“बॅनर, होर्डिंग किंवा फलकांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे फोटो लावणे टाळा. ही गोष्ट अज्ञानातून घडत असेल, तरी ती त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे.”
प्रबोधनाची गरज:
शहरातील काही भागांमध्ये अशा प्रकारचे बॅनर झळकत असून त्यावरील बाबासाहेबांच्या प्रतिमेसोबत राजकीय नेत्यांचे अथवा कार्यकर्त्यांचे मोठ्या आकाराचे फोटो लावलेले दिसतात. हे अनावश्यक प्रसिद्धीच्या मोहातून झालेले असले, तरी त्यामागे डॉ. आंबेडकर यांच्यावरील अपार श्रद्धेला गालबोट लागू शकते.
आपण त्यांच्या चरणांशीही तुलना करू शकत नाही:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ती नव्हते, तर विचार, चळवळ आणि प्रेरणा आहेत. त्यांच्याशी स्वतःची प्रतिमा लावणं म्हणजे आपण त्यांच्या तोलामोलाचा असल्याचा चुकीचा संकेत देणं होय. यामुळे नव्या पिढीपर्यंत चुकीचा संदेश पोहचण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एक विनम्र आवाहन:
“जर नकळत किंवा उत्साहाच्या भरात अशा प्रकारचे बॅनर छापले गेले असतील, तर कृपया त्यातून स्वतःचा फोटो हटवा. बाबासाहेबांना नमन करायचं असेल, तर केवळ त्यांच्या प्रतिमेसमोर उभं राहून हात जोडले तरी पुरेसं आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा आपला आदर, आपली भावना, आपले प्रेम – हे त्यांच्याबद्दलची नम्रता दाखवूनच खरं ठरवावं, हेच खरे अभिवादन.

