
लातूर: फुले हा सिनेमा 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार होता परंतु काही कट्टर जातीयवादी संस्थांनी विरोध करून हे प्रदर्शन थांबवले आहे.हा सिनेमा ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा आहे. हे कारण त्यांनी दिले आहे. यावरून आज ही फुल्यांनी केलेले समाज उद्धाराचे आणि स्त्री- शुद्रांच्या उद्धाराचे कार्य तथाकथित उच्चवर्णी यांच्या पचनी पडत नाही, हेच यावरून दिसून येते. खरे तर फुले दांपत्य कधीच ब्राह्मण द्वेष्टे नव्हते हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार सिद्ध केले आहे. विधवा पुनर्विवाह, केश वपन विरोधी चळवळ, बालहत्या प्रतिबंधक गृह, शेतकऱ्यांसाठीचे कार्य यासारख्या चळवळी याचे द्योतक आहेत. म्हणून महा.अनिस च्या वतीने व समविचारी संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना ‘फुले’ हा सिनेमा कोणताही बदल न करता ताबडतोब प्रदर्शित करावा म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना हे निवेदन पाठवतील अशी आम्ही आशा बाळगतो. असे आव्हान महा. अनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे व शहर कार्याध्यक्ष गणेश गोमारे व उपस्थित सर्व सदस्यांनी केले आहे.

