
लातूर -(अभय मिरजकर) शिक्षणातील लातूर पॅटर्न नावाजलेला आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात लातूरची ओळख म्हणजे खाद्यसंस्कृती असणारा जिल्हा अशी आहे. लातूरच्या हलवाईचा पेढा खाल्ला नाही असे एकही घर लातूरात शोधूनही सापडणार नाही. लातूरकर नातेवाईकांकडे मिठाई घेऊन जातान हमखास घेऊन जाणारा पदार्थ म्हणजे लातूरचा प्रसिध्द असणारा हलवाईचा पेढा. वाढत्या महागाईचा फटका या पेढ्यांनाही बसलेला असून आज रोजी हा पेढा ३४० रुपये किलो या दराने विकला जात आहे.

किसनराव तुळजाराम हलवाई (आर्य) यांनी लातूर शहरातील सुभाष चौकात १९३० मध्ये या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली. या व्यवसायामध्ये सध्या त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. किसनराव हलवाई यांना तीन मुले विठ्ठलराव, नरदेव आणि सुभाष. सध्या विठ्ठलराव यांचे पुत्र विजयकुमार विठ्ठलराव हलवाई (आर्य) हे दुकानाचा कारभार सांभाळत आहेत. त्यांना त्यांची मुले श्रीकांत आणि प्रशांत हे मदत करतात. हलवाई यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य या व्यवसायामध्ये आहेत. सुभाष चौकातील ेुंमुख्य शाखेसोबतच शहरातील शिवाजी चौक, ५ नंबर चौक, औसा रोड आणि सुभाष चौकात अन्य दोन शाखा हलवाई कुटूंबियांच्यावतीने चालवण्यात येतात. परंतू विश्वासार्हता मात्र सुभाष चौकातील मुख्य शाखेचीच सर्वाधिक आहे.
हलवाई कुटूंबियांमधील किमान ७ जण या व्यवसायात सक्रिय आहेत सोबतच अन्य किमान ९ कामगार दररोज कामात असतात. सिझनमध्ये मात्र कामगारांची संख्या वाढवण्यात येते. सध्या दररोज किमान ५० किलो पेढयांची विक्री होत असते. सिझनमध्ये दररोज किमान १५० किलोचा माल विक्री होत असतो.

घरात सायकल घेतलेली असो की अन्य दुचाकी, चारचाकी, घर खरेदी असो की वाढदिवसाची पार्टी असो. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, पाडवा अथवा अन्य कोणताही सण, जयंती, उत्सव असो हलवाईंचा पेढा हवाच ही लातूरकरांची आग्रही मागणी असते.
विजयकुमार हलवाई यांनी सांगीतले की, सध्या सिझन कमी आहे. ८० रुपये किलो दराने प्रारंभी पेढाा विकला होता आता तो ३४० रुपयांवर गेला आहे. चांगल्या प्रतिचे दुध, चांगला खवा आणि कमी साखर हे या पेढयाचे वैशिष्ट आहे. महागाई वाढत आहे त्याचा फटका या व्यवसायालाही बसलेला आहे. परंतू कमित कमी नफा हे सुत्र ठेऊन व्यवसाय करत असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे. सध्या विलायची ४ हजार रुपये किलो झालेली आहे. गॅस सिलेंडरचे दर २४०० रुपये झालेले आहेत. कामगारांचे पगार ही वाढलेले आहेत त्यामुळे दर वाढलेले आहेत असेही त्यांनी सांगीतले.

मधुमेहाचे प्रमाण वाढत चालेले आहे. त्यामुळे लोकांचे गोड खाण्याचे प्रमाणही कमी होत आहे त्यामुळे आता शुगर प्रâी मिठाई बनवण्याचे नियोजन आहे. पेढाही लवकरच शुगर प्रâी तयार करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगीतले.
हलवाई यांच्याकडील पेढा जेवढा प्रसिध्द आहे त्यासोबतच इतर पदार्थांनाही ग्राहकांची मागणी आहे . त्यामुळे जिलेबी, गुलाबजामुन, कुंदा, बर्फी, खवा बर्फी, म्हैसुरपाक, मावापुरी, फरसाण, बुंंदीचा लाडू यांचीही विक्री याठिकाणी होते परंतू दुकानाची प्रसिध्दी आहे ती केवळ पेढयांचे उत्पादक म्हणूनच. पुर्वी भल्या पहाटे ५ वाजता हलवाई यांचे दुकान सुरु व्हायचे. कामगार काम करण्यासाठी यायचे परंतू सध्या सकाळी ८ वाजता काम सुरु होते असेही त्यांनी सांगीतले.हलवाई यांची चौथी पिढी या व्यवसायात सक्रीय आहे त्याचप्रमाणे लातूरकरांची चौथी पिढी हलवाई यांच्या पेढयांची शौकीन आहे.

