अयोध्या कॉलनीतून माझं लातूरकडे आर्त हाक

शहरातच रस्त्यांची दयनीय अवस्था — अयोध्या कॉलनीतून ‘माझं लातूर’कडे आर्त हाक
लातूर शहरातील अयोध्या कॉलनी, जुना औसा रोड येथील लालबहादुर शास्त्री विद्यालय परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खरंतर येथे ‘रस्ता आहे’ असं म्हणणंही कठीणच. सध्या त्या परिसरातील नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी यांना दररोजच मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय.

चिखल, खड्डे आणि उखडलेला रस्ता हे चित्र ग्रामीण भागात नाही, तर शहराच्या हृदयस्थानी दिसत आहे, हे विशेष लक्षवेधी आहे. या ठिकाणी दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका नेहमीच सतावत आहे.
परिसरातील नागरिकांनी अखेर ‘माझं लातूर’ परिवाराकडे धाव घेतली असून, लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी केली आहे. “पावसाळ्यापूर्वी तरी काही तरी कृती होईल,” अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरात अनेक भागांत रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी निधी जाहीर होतो, योजना आखल्या जातात, पण प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे लांबणीवर पडतात. प्रशासनाचे लक्ष केव्हा वेधले जाईल, हा खरा प्रश्न आहे.

