
लातूर :
भाजपाची सत्ता असूनही, तसेच गायीला “राजमाता” चा दर्जा देण्यात आलेला असतानाही, लातूर जिल्ह्यात गोरक्षकांना गायींच्या रक्षणासाठी अमरण उपोषण करावं लागत आहे. गांधी चौक येथे सुरु असलेल्या या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
गोरक्षकांच्या मते, लातूर शहरात सध्या परवानगी नसतानाही शंभरहून अधिक बिफ शॉप्स अवैधपणे चालू आहेत आणि त्याठिकाणी खुलेआम गोवंशाची विक्री केली जात आहे. याशिवाय, ५० पेक्षा जास्त अवैध कत्लखाने देखील कार्यरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
गोरक्षकांनी पोलिसांना सूचना देऊन अनेकवेळा गोवंश ताब्यात दिला असला तरी काही ठिकाणी पोलिसांनीच गोवंश गोशाळेत न देता पुन्हा खाटकांना परत दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच गोरक्षकांवर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे की, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून सर्व अवैध कत्लखाने आणि बिफ शॉप्स कायमस्वरूपी बंद करावेत. अन्यथा, हे अमरण उपोषण आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

