
लातूर, प्रतिनिधी –
लातूरकरांसाठी गेल्या काही दिवसांपासून त्रासदायक ठरलेला पिवळसर व घाण वास असलेला नळपाणी पुरवठा आता शासनाच्या रडारवर आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट हरंगुळ बु. येथील जलशुद्धीकरण केंद्रावर धडक देत पाहणी केली.

या अचानक भेटीमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. अधिकारी व कर्मचारी तांत्रिक माहिती सादर करण्यात आणि कारणमीमांसा देण्यात व्यग्र झाले. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व यंत्रणा प्रत्यक्ष पाहून पाण्याच्या शुद्धतेविषयी सखोल चौकशी केली. त्यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर बारीक निरीक्षण केले आणि शंका विचारल्या.

“शहरातील नागरिकांना मिळणारं पाणी हे शंभर टक्के शुद्ध असायलाच हवं. त्यात रंग, वास किंवा कोणतीही अशुद्धता असणे सहन केले जाणार नाही,” असे ठणकावून सांगत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या दरम्यान नागरिकांच्या तक्रारींचा ढीग मंत्रीमहाशयांसमोर ठेवण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “लोकांचे आरोग्य आमच्यासाठी प्राथमिकता आहे. पाणीपुरवठ्यातील दोष सुधारण्यासाठी कोणतीही किंमत लागली तरी ती शासन देईल, पण नागरिकांना दूषित पाणी मिळणार नाही, याची हमी मी स्वतः देतो.”
तसेच त्यांनी पुढीलप्रमाणे काही ठोस सूचना दिल्या:
- तातडीने जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करावी.
- पाणी तपासणीसाठी स्वतंत्र व तज्ज्ञ पथक नियुक्त करावे.
- दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- शहरातील विविध भागांतील पाणीनमुन्यांचे दररोज परीक्षण करण्यात यावे.
- नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर कृती करावी.
विविध पातळ्यांवर गळती व दूषिततेचे स्रोत शोधून बंद करण्याचे आदेश देताना त्यांनी ‘गुणवत्तेवर तडजोड नको’ असा स्पष्ट संदेश दिला.
या दौऱ्यानंतर लातूर शहरात नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाने आता जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पालकमंत्र्यांच्या सक्रियतेचे स्वागत केले आहे.
लातूरकरांना शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी हा दौरा एक निर्णायक टप्पा ठरेल, अशीच अपेक्षा आता प्रत्येक लातूरकर बाळगून आहे.

