
दलालामार्फत बोगस प्रस्ताव मान्य; शिक्षणाधिकारी मापारी यांच्यावर गंभीर आरोप; आयुक्तांची चौकशीसाठी होकार
लातूर – नागपूर विभागातील शिक्षक भरतीतील ‘रॉकेट’ घोटाळ्याचा भडका अद्याप शांत झाला नसतानाच, लातूर जिल्ह्यातील देशिकेंद्र विद्यालयात बनावट कागदपत्रांवर झालेली शिक्षक भरती प्रकाशात आल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचालित देशिकेंद्र विद्यालयात स्नेहल कुमार नामदेव खुडे यांची सन 2016 पासून सेवक असल्याचे खोटे कागदपत्र तयार करून त्यावर शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी कोणतीही खातरजमा न करता मान्यता दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या प्रक्रियेत दलालामार्फत पैसे घेत ‘हात ओले करून’ मापारी यांनी बनावट प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप आहे.
स्नेहलकुमार खुडे या बोगस मान्यतेसोबत याच संस्थेतील विनाअनदानितवरून अनुदानित बदल्या दाखवून मोठ्या प्रमाणावर बोगस भरती महात्मा बसवेश्वर संस्थेत केली आहे. यात तत्कालिन शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहिरे यांनी विनाअनुदानितवरील नियुक्त्यांना बोगस बनावट कागदपत्राच्या आधारे मान्यता दिल्याचे दिसून येते. या मानयतांचीही कोणत्याही संचिका उपलब्ध नसून फक्त आदेश तयार करून मान्यतेची प्रक्रिया धाराशिवमधून राबवली गेली आहे. मोहिरे यांच्या कार्यकळ आणि मान्यतेचा कालावधी यामधे तफावत असून या सर्व मान्यतांचीही चौकशी करणेबाबत श्री.भोसले यांनी शिक्षण आयुक्तांकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे. तसेच या संस्थेतील दलाल मुसळे याच्या पुतणीला शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून नियुक्ती व मान्यतेसोबत अनेक अधिका-यांच्या नातेवाईकांना बॅकडेटेड मान्यता दिलेल्या आहेत.
केवळ या बोगस मान्यता एवढेच नव्हे, तर लातूर जिल्ह्यातील मुरुडसह अनेक भागात अशा बोगस नियुक्त्या दिल्या गेल्याचा आरोप तक्रारदार भोसले यांनी थेट शिक्षण आयुक्तांकडे समक्ष भेट घेऊन केला.
या प्रकरणात भोसले हे शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी असून, त्यांनी 23 एप्रिल 2025 रोजी शिक्षण आयुक्तांची भेट घेत संपूर्ण पुरावे सादर केले. आयुक्तांनी पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले असून, यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी उपस्थित होते.
स्नेहल खुडे हा नामदेव खुडे या स्वयंघोषित ‘सत्यशोधक समाज पक्षाच्या’ नेत्याचा मुलगा आहे, ज्याच्यावर अधिकाऱ्यांना धमकावून आर्थिक लाभ घेण्याचे आरोप आहेत. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर नामदेव खुडे यांनी उलटपक्षी तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत न्यायालयात अपील दाखल केले आहे.
शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्यावरही याआधी अनेक प्रकरणांत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये अर्धनग्न निषेध करून एका व्यक्तीने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
तक्रारदार भोसले यांनी माहिती अधिकारात महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 2016 पासूनच्या सर्व मान्यतांची माहिती उघड करत यामागील जाळे समोर आणले आहे.
लातूरमधील या प्रकरणामुळे आता नागपूर ‘रॉकेट’सारखीच दुसरी मोठी ‘लातूर बोगस भरती रॉकेट’ केस पुढे येण्याची शक्यता असून, शासनाने याची तत्काळ सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी आता शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

