
खुर्दळी, ता. चाकूर (जि. लातूर) :
सैन्याच्या विजयासाठी आणि शत्रूंवर मात करण्यासाठी श्री जनमाता देवीच्या चरणी साकडे घालत संपूर्ण गावाने एकत्र येत देशप्रेमाचा आगळा वेगळा संदेश दिला. चाकूर तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या खुर्दळी येथील श्री जनमाता आई मंदिरात भारतीय सैनिकांच्या विजयासाठी व रक्षणासाठी महाआरती करण्यात आली.

देशावर संकटाचं सावट असताना, गावकऱ्यांनी देवतेपाशी प्रार्थना केली – “आमच्या जवानांना लढण्याचं बळ दे, त्यांच्या पाठीशी उभं रहा आणि युद्धात होणारे नुकसान टाळ.”

आरतीच्या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान जय विज्ञान अशा गगनभेदी घोषणा मंदिर परिसरात घुमल्या. देशभक्तीपर गीते, जनगणमन आणि वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने वातावरण भारावून गेलं.

या कार्यक्रमात 1971 च्या भारत-पाक युद्धात सहभागी झालेले सेवानिवृत्त सैनिक अहमद शेख, डॉ. पी.एम. नरहरे, सरपंच प्रचिता भोसले, ग्रामपंचायत सदस्य, ह.भ.प. मोहन महाराज, व मंदिर विश्वस्त मंडळातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.

देशासाठी सैनिक जे लढत आहेत, त्यांच्या मानसिक व अध्यात्मिक बळासाठी हे आयोजन केल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले. गावकऱ्यांची एकजूट, भक्ती, आणि देशासाठी असलेली भावना ही देशप्रेमाची अतूट प्रेरणा ठरली

