बडूर, ता. निलंगा – बडूर गावचे आदर्श शिक्षक कै. गुरुलिंग हासुरे गुरुजी यांचा निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. गावकऱ्यांनी न्यायासाठी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला अखेर यश मिळाले असून, भाजप नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या तडफदार भूमिकेमुळे अवघ्या २४ तासांत उर्वरित दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. २६ एप्रिल रोजी औंढा (ता. निलंगा) येथे जमावाने केलेल्या मारहाणीत हासुरे गुरुजी यांचा बळी गेला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होते. ग्रामस्थांनी २ मेपासून बडूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते. डॉ. अर्चनाताई पाटील यांनी दि. ८ मे रोजी उपोषण स्थळी भेट देत ग्रामस्थांचे दुःख समजून घेतले व थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याशी संपर्क साधत तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रभावी पाठपुराव्यामुळे तपासाला वेग आला आणि पोलिसांनी अल्पावधीत परराज्यातून आरोपींना अटक करत कायदा-सुव्यवस्थेचा धाक पुन्हा प्रस्थापित केला.
गावकऱ्यांनी डॉ. अर्चनाताईंच्या या धडाडीला सलाम करत त्यांचे व पोलिस दलाचे मन:पूर्वक आभार मानले. बडूर गावात आता समाधानाचे वातावरण असून, न्यायासाठी उभा राहिलेल्या एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“शब्द दिला होता, तो पाळलाच!” – डॉ. अर्चनाताईंच्या कार्यशैलीला ग्रामस्थांचा मनापासून सलाम.

