
लातूर : लातूर शहरातील वासनगाव रोडवर स्थित राजनंदा विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी निकालामुळे शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर असलेला भर सिद्ध केला आहे.
या परीक्षेत पवन पांचाळ याने तब्बल ९९.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक, तर ओंकार मोरे याने ९४.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक, आणि आदिती सोळंखे हिने ९०.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संपूर्ण लातूर परिसरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त सहभाग असलेल्या या शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण न देता, उत्तम तांत्रिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व नेतृत्वगुण वृद्धिंगत होत आहेत, असा अनुभव पालक वर्गाने व्यक्त केला आहे.
शाळेचे संचालक श्री. राजेंद्र कोळगे, मुख्याध्यापिका सौ. सुश्मिता सगरे, प्रशासक श्री. शिवराज कोळगे व आशिष कोळगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व शिक्षकवृंदाचेही विशेष कौतुक करून त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.
राजनंदा विद्यालयाच्या या यशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात शाळेची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शाळेचे सातत्यपूर्ण यश हे तेथील उत्तम नियोजन, शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांचा प्रामाणिक प्रयत्न यांचे मूर्त स्वरूप असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

