
लातूर : मार्च २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, श्री. श्री. रविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कूलने पुन्हा एकदा १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत लातूरच्या शैक्षणिक नकाशावर आपली ठळक छाप उमटवली आहे. ही यशस्वी घोडदौड सलग आठव्यांदा साध्य करत शाळेने आपली गुणवत्तेची ओळख अधोरेखित केली आहे.
या परीक्षेत पृथ्वी पवार याने ९९.२% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक, आर्या हलकुडे हिने ९८.८% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर राघवेंद्र कुलकर्णी याने ९७.८% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
उल्लेखनीय आकडेवारी :
- एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी हे ९०% पेक्षा अधिक गुण मिळवण्यात यशस्वी ठरले.
- ५९ विद्यार्थी यांनी ८०% पेक्षा अधिक, तर
- ७४ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण मिळवले.
ही आकडेवारी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या सर्वांगीण दृष्टीकोनाचे द्योतक आहे.
विषय निहाय घवघवीत यश :
- माहिती तंत्रज्ञान – ७ विद्यार्थी
- सामाजिक शास्त्र – २ विद्यार्थी
- मराठी, गणित, विज्ञान – प्रत्येकी १ विद्यार्थी
या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेचा गौरव वाढवला.
या भव्य यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. राजेंद्र कोळगे सर, संचालिका सौ. सुनंदा कोळगे दिदी, कार्यालयीन व्यवस्थापक श्री. आशिष कोळगे सर, तसेच मुख्याध्यापिका सौ. विनया मराठे दिदी यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि सर्व शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांनी सांगितले की, “हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायमच कटिबद्ध आहोत. उज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी शाळेचे कार्य अधिक जोमाने चालू राहील.”
श्री. श्री. रविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या या यशामुळे लातूरमधील शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी पायंडा निर्माण झाला आहे.

