
‘व्हिजन फॉर सोशल जस्टिस’च्या उपक्रमातून सामाजिक समतेचा संदेश; आतापर्यंत १८८ जणाचा विवाह सोहळ्यांचे आयोजन

लातूर, ता. १८ (प्रतिनिधी):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समता आणि माणुसकीची शिकवण अंगीकारत ‘व्हिजन फॉर सोशल जस्टिस’ अर्थात ‘व्ही. एस. पँथर्स’ या संस्थेच्या वतीने लातूर येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात एकूण ३८ नवविवाहित जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले.सामाजिक समतेचा संदेश देत, धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडणारा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. ‘


या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी स्वतः उपस्थित राहून जोडप्यांना शुभाशीर्वाद दिले. विवाह मंडपात विविध धर्म, जात, वंचित व गरजू कुटुंबांतील वधूवर एकत्र आले होते. यामध्ये २ मुस्लिम, १५ हिंदू आणि उर्वरित बौद्ध समाजातील नवविवाहितांचा समावेश होता.

या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, जातिनिरपेक्षता आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे हे सलग सहावे वर्ष असून, आतापर्यंत एकूण १८८ जोडप्यांचे विवाह या माध्यमातून पार पडले आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी दिली.
ठळक मुद्दे:
- ३८ नवविवाहित जोडप्यांचा सामूहिक विवाह
- २ मुस्लिम, १५ हिंदू आणि २१ बौद्ध समाजाचे वधूवर सहभागी
- विवाहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ही ऐतिहासिक जागा
- हजारो नागरिकांची उपस्थिती आणि शुभेच्छांचा वर्षाव
- विवाह खर्चाच्या अनाठायी ओझ्यावर समाजोपयोगी पर्याय

या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याला आलेल्या नागरिकांनी नवदांपत्यांना भरभरून आशीर्वाद दिले. “हे केवळ विवाह नव्हते, तर सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा एक प्रेरणादायी सोहळा होता,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,आमदार अभिमन्यू पवार ,माजी मंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदारे शिक्षक आमदार विक्रम काळे,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विनोद खटके म्हणाले, “विवाहात होणारा खर्च अनेक कुटुंबांच्या पाठीवरचा आर्थिक भार ठरतो. सामूहिक विवाह उपक्रम हे त्या भारातून सुटका करून समाजाला एकसंध ठेवण्याचे साधन आहे.”




