
“गाडी आली!” हे दोन शब्द ऐकताच संपूर्ण स्टेशन कसे गजबजत असे. त्या गाडीतून उतरलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरची अपेक्षा, डब्यांतून डोकावणारी पोती, हातात टिफीनचा डबा, डोळ्यांत गावची ओढ… आणि धुरात मिसळणारी त्या ‘देवगाडी’ची शिट्टी — हे सगळं लातूरच्या जनजीवनाचा एक अविभाज्य भाग होतं. हीच बार्शी लाईट रेल्वे.


मी आज जळगावमध्ये राहतो, तरी लातूरचे आणि त्या BLR चे आठवणी मनात कायम घर करून राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विनायक काळे साहेब, रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, आणि आमचे मित्र शेखर पाटील यांच्याशी गप्पा करताना या आठवणींचा पूर उसळला.
काळे साहेब म्हणाले, “माझी पहिली पोस्टिंग पंढरपूरला झाली.” आणि त्या वाक्यानिशी मनाची गाडी सरळ लातूरच्या वासनगाव फाट्याजवळ थांबली. लातूरमधली बालपणाची ती रेल्वेगाडी — देवगाडी — आठवणींच्या खिडकीतून डोकावू लागली.

जीवनाच्या लयीतली गाडी
त्या काळात आमचं जीवन सुतगिरणीच्या भोंग्यावर आणि बार्शी लाईट रेल्वेच्या शिट्टीवर चालायचं. भोंगा वाजला की शिफ्ट बदलायची. शिट्टी वाजली की स्टेशनचा गेट बंद होणार — म्हणजे “चला, उशीर होतोय!” अशी घराघरात लगबग. गाडी गेली की गेट उघडायचा, आणि मग जीवन पुढे सरकायचं.

लहानपणी रेल्वेगाडीकडे बघणं म्हणजे आमच्यासाठी एखाद्या चमत्कारासारखं होतं. सहावीत असताना स्टेशनवर चोरून जाऊन डब्यात बसायचो. एकदा तर थेट येडशीपर्यंत गेलो! मामाचा मार खाल्ला पण त्या प्रवासाच्या आनंदाला तो तोडीस नसे. चालत्या गाडीतून पाणी भरणारी मोठी मुलं, उस तोडणारे हात, गाडीचा संथ वेग… हे सगळं त्या बालपणीच्या आठवणींत आजही स्पष्ट जपलेलं आहे.

इतिहासाची पाऊलखुण
1897 मध्ये ब्रिटिशांच्या गोल्डन रॉक कंपनीने बार्शी लाईट रेल्वेची (BLR) स्थापना केली. उद्देश होता – धाराशिव-लातूर परिसरातील शेतीमाल जसे की कापूस, ज्वारी, बाजरी मोठ्या बाजारांपर्यंत पोहोचवणं.
कुर्डुवाडी ते पंढरपूर ही लाईन असल्यामुळे ती देवगाडी म्हणून ओळखली जायची. लातूरहून बार्शी, मुरुड, येडशी, पांगरी अशी ही लाईन गावागावांशी जोडणारी एक महत्त्वाची कडी होती.

शिक्षण, व्यवहार आणि संस्कृती
त्या काळी लातूरमधील अनेक विद्यार्थी बार्शी आणि उस्मानाबाद येथे शिक्षणासाठी जात असत. रेल्वेच्या वेळांवर त्यांच्या क्लासेस ठरत. स्टेशनवरचा पोह्याचा घमघमाट, टपरीवरचा चहा, आणि खिडकीतून दिसणारं रानसौंदर्य — हे प्रवासाचे अविभाज्य भाग होते.
व्यापाऱ्यांसाठी BLR ही लाईफलाईन होती. कापूस, डाळी, शेतमाल यांची वाहतूक हिच्यामुळे सोपी झाली. गाडीच्या वेळापत्रकावर व्यवहार ठरत. स्टेशन म्हणजे लातूरच्या सामाजिक आणि आर्थिक गतीचं केंद्र होतं.
मुक्ती संग्रामातला मूक साक्षीदार
स्वातंत्र्यपूर्व काळातही या रेल्वेचं महत्त्व वेगळं होतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी बार्शी हे ब्रिटिश भारताचा भाग झाला, पण लातूर, धाराशिव हे निजामशाहीतच होते. एक वर्षानंतर, 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन हे भाग भारतात आले. त्या काळात BLR ही फक्त वाहतुकीचं साधन नव्हती, ती आंदोलनांचा मूक साक्षीदार होती.

आजही मनातली चालती रेल्वे
1990 नंतर BLR चे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले. त्या टुमदार स्टेशनांच्या जुन्या इमारती आता विराण वाटतात. पण मनात मात्र अजूनही ती धुरावलेली गाडी संथपणे धावत राहते.
लातूरच्या जुन्या फलकावर कोरलेलं ‘बार्शी लाईट रेल्वे – BLR’ हे नाव आजही अनेकांच्या स्मरणात कोरलेलं आहे. ही गाडी जरी थांबली, तरी तिच्या आठवणींची रेल्वे अजूनही आपल्या आठवणींच्या स्टेशनवरून धावत असते.
BLR : फक्त रेल्वे नव्हे, तर संस्कृती
BLR म्हणजे केवळ अरुंद पट्ट्याची एक साधी रेल्वे नव्हती — ती एक संस्कृती होती. गावाशी नाळ जुळवणारी, व्यापार घडवणारी, आणि माणसांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक सजीव प्रेरणा होती.
ती हरवली खरी, पण काळजाच्या एका कोपऱ्यात अजूनही तिचा श्वास ऐकू येतो…
(लेखक – युवराज विनायकराव पाटील, माजी जिल्हा माहिती अधिकारी, लातूर)

