
लातूर, दि. १९ मे २०२५ – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यासोबतच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचेही लातूर विमानतळावर आगमन झाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचीही उपस्थिती होती. लातूरहून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरद्वारे परळी वैजनाथकडे प्रयाण केले.

या दौऱ्यादरम्यान, लातूर येथे ज्येष्ठ विधीज्ञ व्यंकटराव बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
महायुती सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिंदू खाटीक समाजासाठी स्वतंत्र उपमहामंडळ स्थापन केले असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी निधीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. राज्यभरातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये खाटीक उपमहामंडळाचे फलक लावणे आणि कर्जवाटपाचे निर्देश देण्याचीही विनंती यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर अॅड. प्रदीपसिंह गंगणे, गणेश सौदागर, साईनाथ घोणे, अॅड. सुहास बेंद्रे, दिगंबर कांबळे, राजू बुये, किरण कांबळे, अॅड. दत्तात्रय बेंद्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

