
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी रविवारी नवी दिल्लीत भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत देशाच्या सुरक्षाविषयक घडामोडी, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीचे अभिनंदन तसेच लातूर जिल्ह्यात प्रस्तावित पॅरामिलिटरी प्रशिक्षण व फायर-फायटिंग रेंजचा प्रलंबित प्रस्ताव आदी मुद्द्यांचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता दिली.
2007-08 मध्ये तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यात पॅरामिलिटरी दलांसाठी समर्पित फ्री फायर-फायटिंग रेंज व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे सर्वेक्षण झाले होते. तांत्रिक मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर असताना प्रस्ताव प्रलंबित राहिला. “हा प्रस्ताव तातडीने पुनरावलोकन करून अंमलात आणावा,” अशी विनंती डॉ. चाकूरकरांनी अमित शहांना केल्याचे त्यांनी सांगितले
लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तसेच चाकूर येथील सीमा सुरक्षा दल (BSF) छावणीला प्रत्यक्ष भेट देण्याची मागणीही त्यांनी केली. “या छावण्यांत नवी प्रशिक्षण साधने व निवासी सुविधा उभारल्यास स्थानिक युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील,” असे डॉ. चाकूरकरांनी सांगितले
ऑपरेशन ‘सिंदूर’बद्दल भारतीय लष्कराचे अभिनंदन करताना त्यांनी लिहिले, “ही कारवाई केवळ सीमांची सुरक्षा नव्हे, तर भारताच्या जागतिक सामर्थ्याची ठसठशीत घोषणा आहे.” त्यांच्या मते, लातूरमध्ये प्रस्तावित पॅरामिलिटरी रेंज हा जिल्ह्याच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वाचा टप्पा ठरेल.
गृह मंत्रालय लवकरच प्रस्तावाचा अद्ययावत खर्च व तांत्रिक व्यवहार्यता अहवाल मागवणार असून, राज्य सरकारच्या सहकार्याने जमीन अधिग्रहण व पायाभूत सुविधांच्या निर्णयांना गती देण्याचा विचार आहे, असेही त्यांनी यावेळी बोलत असताना अधोरेखित केले

