
लातूर | गांधी मार्केट परिसरात 11 केव्ही वाहिनीवर बॅनर कोसळल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला असून, महावितरणने रात्री १२ पर्यंत वीज बंद राहील, असे आधीच सांगितले होते. मात्र हा बॅनर वेळेत काढण्यासाठी महापालिकेने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. मनपा केवळ होर्डिंगचा कर गोळा करत आहे, पण जनतेच्या सुरक्षिततेबद्दल मात्र पूर्णपणे उदासीन आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातून अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले होते. परंतु आता पुन्हा युनिपोलच्या नावाखाली मुख्य रस्त्यांवर जाहिरात माफियांचा कब्जा वाढला आहे. मुख्य रस्ते नागरिकांसाठी आहेत की जाहिरातींसाठी, हा प्रश्न आता लातूरकर विचारत आहेत.
शहरभर ठिकठिकाणी फुटाफुटावर उभे केलेले युनिपोल कोणत्या निकषांनुसार लावले गेले? याचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट जनतेसमोर सादर केलेले नाही. युनिपोल किती उंचीचे, किती अंतरावर, कोणत्या साईजचे असावेत याचे कोणतेही नियम मनपा स्पष्ट करत नाही. उद्या हे युनिपोल कोसळल्यास त्याला जबाबदार कोण? ही जनतेच्या मनात असलेली मोठी शंका आहे.

गांधी मार्केटमधील होर्डिंग कोसळल्यानंतर वीज पुरवठा ठप्प असून, महावितरणला काम करणे अशक्य झाले आहे कारण मनपाचे कर्मचारी ढांचा हटवण्यास टाळाटाळ करत आहेत. मनपाचे हे वागणे केवळ दुर्लक्ष नव्हे तर जनतेच्या जीवाशी खेळ आहे.

यापुढे होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेसाठी मनपाच जबाबदार असणार का? की पुन्हा “बेवारस” म्हणून हात झटकले जाणार? लातूरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मनपा आणि जाहिरात माफियांचे संगनमत आता जनतेच्या जीवावर बेतू नये, यासाठी तातडीने उपाययोजना आणि जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

