
लातूर, दि.२६ (प्रतिनिधी) – मागील अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १९.७ मि.मी. पाऊस होत असतो. यावर्षी आजपर्यंतच तब्बल १९४.३ मि.मी. सरासरी पाऊस झालेला आहे. टक्केवारीचा विचार केला तर तब्बल ९८६.३ टक्के सरासरी अधिक पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यातील बॅरेजेस मधून प्रथमच मे महिन्यात नदीपात्रात पाणी सोडावे लागले. लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या मांजरा प्रकल्पात आज रोजी केवळ १९.८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर निम्न तेरणा प्रकल्पात ४७.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मे महिन्यात लातूर जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल १२ दिवस पाऊस झालेला आहे.
मराठवाड्यातील लातूर हा तसा कायम दुष्काळी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर तीन वर्षांनी या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात भासत असतो. मागील अनेक वर्षाच्या कालावधीत या वर्षी प्रथमच थेट मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर जिल्ह्यात लवकर पाऊस झाल्यानंतर जून, जुलै मध्ये पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. सध्या पाऊस पडत असतानाही सर्वांच्या मनात त्याचीच चिंता अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मे महिन्यात लातूर जिल्ह्यात १९.७ टक्के सरासरी पाऊस होत असतो. त्यामध्ये लातूर तालुका २१ मि.मी., औसा तालुका २२ मि.मी., अहमदपूर तालुका १६.८ मि.मी., निलंगा तालुका २०.४ मि.मी, उदगीर तालुका २२ मि.मी., चाकूर तालुका २६.५ मि.मी., रेणापूर तालुका २०.२ मि.मी., देवणी तालुका १४.६ मि.मी., शिरूर अनंतपाळ तालुका ५.५ मि.मी. तर जळकोट तालुक्यात ६.८ मि.मी. पाऊस होत असतो.
यावर्षी मात्र आजपर्यंत लातूर तालुक्यात १९९.३ मि.मी., औसा तालुका १८९.८ मि.मी., अहमदपूर तालुका १५२.०१ मि.मी., निलंगा तालुका १९९ मि.मी, उदगीर तालुका २१०.९ मि.मी., चाकूर तालुका १९०.७ मि.मी., रेणापूर तालुका १७५.०९ मि.मी., देवणी तालुका २६९.७ मि.मी., शिरूर अनंतपाळ तालुका १९६.१ मि.मी. तर जळकोट तालुक्यात १७०.६ मि.मी. पाऊस झालेला आहे.
आजपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस पाहिला तर लातूर तालुक्यात ९४९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. औसा तालुक्यात ८६२.७ टक्के, अहमदपूर तालुक्यात ९०५.४ टक्के, निलंगा तालुक्यात ९७५.५ टक्के, उदगीर तालुक्यात ९५४.३ टक्के, चाकूर तालुक्यात ७१९.६ टक्के, रेणापूर तालुक्यात ८७०.८ टक्के, देवणी तालुक्यात १८४७.३ टक्के, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३५६५.५ टक्के, जळकोट तालुक्यात २५०८.८ टक्के अधिक पाऊस आजपर्यंत झालेला आहे.
लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात आज रोजी १९.८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथील प्रकल्पात ४७.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात ५.९० टक्के, रेणापूर मध्यम प्रकल्पात २५.४० टक्के, व्हटी मध्यम प्रकल्पात १०.५२ टक्के, तिरू मध्यम प्रकल्पात ५.१७ टक्के, देवर्जन मध्यम प्रकल्पात ५.४२ टक्के, साकोळ मध्यम प्रकल्पात १६.७१ टक्के, घरणी मध्यम प्रकल्पात २७.८५ टक्के तर मसलगा मध्यम प्रकल्पात ०.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३४ लघू पाटबंधारे प्रकल्पात १५.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील अनेक बॅरेजेस मधून पाणी सोडावे लागले

मांजरा नदीवरील साई बॅरेज मधून १.२७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. आजपर्यंत एकूण ११.०८९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. नागझरी बॅरेज मधून १.११० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजपर्यंत १.९२० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. शिवणी बॅरेज मधून आज रोजी ०.९८५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या बॅरेज मधून आजपर्यंत १४.८४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. खुलगापूर बॅरेज मधून १.०६७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, अजपर्यंत २१.११९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. बिंदगीहाळ बॅरेज मधून सध्या ०.३६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत १७.८६६ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. डोंगरगाव बॅरेज मधून १.४४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात आहे. आजपर्यंत १०.६४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. धनेगाव बॅरेज मधून सध्या ५.५१० दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत तब्बल ५९८.६६४ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. होसूर बॅरेज मधून सध्या १.०८० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात आहे. आजपर्यंत एकूण १३.३२० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. तावरजा नदीवरील भुसणी बॅरेज मधून आजपर्यंत १३१.७२७ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे.
तेरणा नदीवरील राजेगाव बॅरेज मधून ०.०६४ दशलक्ष घनमीटर विसर्ग सुरू आहे. आजपर्यंत एकूण २१४.६६६ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे. किल्लारी बॅरेज मधून ०.३७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात आहे. आजपर्यंत एकूण २३१.९२४ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. लिंबााळा बॅरेज मधून ०.४६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजपर्यंत एकूण ५.७०५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. मदनसुरी बॅरेज मधून ०.२१० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजपर्यंत एकूण २५१.६०९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. गुंंजरगा बॅरेज मधून ०.२६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण २७७.६९६ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. औराद शहाजानी बॅरेज मधून ०.३२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण ३५७.७५९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. तगरखेडा बॅरेज मधून ०.३२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण ३५८.२५५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे.
रेणा नदीवरील रेणापूर बॅरेज मधून ०.०५८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण २.५३४ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. खरोळा बॅरेज मधून ०.२१६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण ६.६४२ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. तेरणा नदीवरील सोनखेड बॅरेज मधून आजपर्यंत १३.७०० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे.

