
लातूर- आज मनुवादी आणि भांडवलशाहीने देशात उच्छाद मांडला असून यामुळे समाजात प्रचंड विषमता निर्माण होत आहे. यामध्ये दलित, कष्टकरी, शोषित समाज मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. भारतीय राज्यघटना समताधीस्ठीत समाज व्यवस्था निर्मितीची अपेक्षा करते. परंतु आज राज्यघटनाच मोडीत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समाज उभारणीसाठी विचारावर निष्ठा असलेले कार्यकर्ते निर्माण करणे आज चळवळीची गरज असते. असे कार्य अॅड. एकनाथ आवाड यांनी केले आहेत. आज अशाच निष्ठावंत कार्यकर्त्याची नितांत गरज झाली आहे. पुन्हा असे कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करणे हीच अॅड.एकनाथ यांना श्रध्दांजली ठरेल. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान शाखा लातूरच्या वतीने आयोजित अॅड. एकनाथ आवाड स्मृती अभिवादन सभेत केले.

मानवी हक्क अभियान शाखा लातूर यांच्या वतीने दलित, कष्टकरी यांचे कैवारी ऍडव्होकेट एकनाथ आवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातूर येथील सरस्वती विद्यालयात जेष्ठ विचारवंत मा. डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आवाड यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी प्राचार्य माधव गादेकर, ज्येष्ठ पत्रकार मा. रामराव गवळी, मा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर सर, ‘लसाकम’ संघटनेचे नेते नरसिंग घोडके , प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले , दिनकर मस्के, छगन घोडके , बालाजी साबळे यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना वाघमारे सर म्हणाले की, आवाड साहेबांनी आंबेडकरी विचारधारेवर चळवळ चालवली. शोषित व दुबळ्या समाजाला ताकद देण्याचे कार्य केले, राज्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्थांना सामाजिक कार्यात गुंतवले, हजारो कार्यकर्ते निर्माण झाले, गायरान जमीन भूमिहीन लोकांना मिळवून देण्यासाठी शासनाकडे योग्य पुराव्यासह पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने शासकीय परिपत्रक काढले, भूमिहीन हजारो कुटुंबे जमिनीचे मालक झाले. न्यायासाठी संघर्ष कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी कार्यातून दिले. या प्रसंगी त्यांचे कार्यपुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी म्हणाले की एकनाथ आवाड यांनी शोषिताच्या मूलभूत प्रश्नावर जन आंदोलन उभारले, संघर्षात्मक व रचनात्मक चळवळ चालविली. आपत्तीच्या काळात लातूरच्या भूकंप कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली. महिलांना संपत्तीत वाटा मिळावा यासाठी जनजागृतीची मोहीम उभारली. असेही त्यांनी सांगीतले. याप्रसंगी माजी प्राचार्य मा. डॉ. माधव गादेकर म्हणाली की, विविध शोषित समाजाच्या संघटनांना एकत्र करण्याची ताकद आवाड साहेबात होती. आणि त्या पद्धतीचे कार्य त्यांच्या आंदोलनात दिसून आले. आज त्या कार्याची नितांत गरज आहे. तसेच या कार्यक्रमा दरम्यान मा. डॉ. शिवाजी जवळगेकर, नरसिंग घोडके, बालाजी साबळे, छगन घोडके यांची समायोजित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.पी. सूर्यवंशी यांनी केले तर आभार शिवदर्शन सदाकाळे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी साळुंखे, दिनकर मस्के, अशोक तोगरे , शिरीष दिवेकर, जयवंत जंगापल्ले, भारत वाघमारे यांनी प्रयत्न केले.

