
राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही, तर ती एक दूरदृष्टी, तत्त्वनिष्ठा आणि जिद्द यांच्या संगमाची कसोटी असते. आज आपण अशाच एका विलक्षण दूरदृष्टी असलेल्या, स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी झटणाऱ्या आणि लोकहितासाठी कोणत्याही अडथळ्यांना न जुमानणाऱ्या नेतृत्वाचा गौरव करत आहोत – नितीन गडकरी.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग – एका निर्णायक निर्णयाची कथा
वर्ष होते 1995. महाराष्ट्र सरकारमध्ये तरुण आणि ऊर्जा-पूर्ण नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणाऱ्या “मुंबई-पुणे एक्सप्रेस वे” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची योजना त्याच काळात पुढे आली.
धीरूभाई अंबानी – देशातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती. त्यांनी सर्वांत कमी निविदा सादर केली – 3,600 कोटी रुपये. सर्वांनी समजले की हे काम आता रिलायन्सलाच मिळणार. पण गडकरींनी विरोध केला. मंत्रिमंडळात स्पष्ट सांगितले – “हा रस्ता 2,000 कोटींपेक्षा कमी खर्चात होऊ शकतो.” या एका वाक्याने महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि उद्योजकीय विश्वात खळबळ उडाली.
धीरूभाईंसोबतची ती ऐतिहासिक भेट
प्रमोद महाजन यांच्या मध्यस्थीने गडकरी अंबानी कुटुंबाला भेटले. जेवणाच्या टेबलावर, धीरूभाईंनी विचारले – “सरकारची औकात आहे काय? तुम्ही रस्ता बांधणार?”
गडकरी उत्तरले – “जर मी हा रस्ता बांधू शकलो नाही, तर मिशा कापून टाकेन. आणि बांधला तर तुम्ही काय कराल, याचा विचार करा.”
हा केवळ संवाद नव्हता – हा होता आत्मविश्वासाचा सिंहगर्जना.
संकल्प, संस्था आणि सफलता
गडकरींनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ची स्थापना केली. खासगी गुंतवणूक आणि सार्वजनिक सहकार्य यांचा मिलाफ साधून निधी उभा केला. अनुभवी अभियंत्यांची चमू तयार केली. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
केवळ काही वर्षांत, 2,000 कोटींपेक्षा कमी खर्चात भारताच्या पहिल्या “एक्सप्रेस वे” चे स्वप्न साकार झाले.
अंती धीरूभाईंची कबुली
हेलिकॉप्टरमधून प्रकल्प पाहून धीरूभाई अंबानी चकित झाले. त्यांनी गडकरींना बोलावले आणि नम्रपणे स्वीकारले –
“नितीन, मी हरलो… तू जिंकलास. तुमच्यासारखे चार-पाच लोक देशात असतील, तर भारताचं नशीब बदलेल.”
ही केवळ रस्ता बांधणी नव्हती – हा होता नवभारताच्या युगाचा प्रारंभ
आज नितीन गडकरी हे नाव केवळ केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे, तर आधुनिक भारताचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘टोल-बूथ’, ‘ग्रीन हायवे’, ‘इथेनॉल इंधन’ अशा अनेक संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. ते कृतीशील नेतृत्व आणि दृढ तत्त्वनिष्ठा यांचे उदाहरण ठरले.
२७ मे १९५७ ला जन्मलेला हा ‘विकासपुरुष’ आजही नव्या वाटा, नव्या संधी आणि नव्या उंची शोधतो आहे.
नितीन गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या कार्याने आणि व्यक्तिमत्त्वाने आपण सदैव प्रेरणा देत राहा, हीच शुभेच्छा!
– दीपरत्न निलंगेकर, युतीचक्र

