
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ च्या तांत्रिक सहकार्य
मोहोळ दि. २६ मे, २०२५ (सोमवार) रोजी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ च्या तांत्रिक सहकार्याने राजाराणी नॅचरल फूड प्रॉडक्ट उद्योगाच्या जांभूळ कुल्फी तसेच जांभूळ शॉट या नवीन दोन प्रक्रिया उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. ग्राहकांना अधिक आरोग्यदायी व मधुमेह मुक्त जीवनशैली देण्यासाठी, म.फु.कृ.वि. कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विविध फळांवर संशोधन करून खास मधुमेहींसाठी दोन नवे प्रॉडक्ट तयार करण्यात आले आहेत.

जांभूळ हे एक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. याचे अनेक पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म आहेत. प्रती १०० ग्रॅम जांभूळामध्ये अंदाजे: उष्मांक (कॅलरी) – ६०-७० कॅलरी, कार्बोहायड्रेट – १४ ग्रॅम, प्रथिने – ०.७ ग्रॅम, चरबी – ०.२ ग्रॅम, फायबर्स – ०.६ ग्रॅम, कॅल्शियम – १५-२० मि.ग्रॅ., फॉस्फरस – १५-१७ मि.ग्रॅ., लोह (Iron) – १.४ मि.ग्रॅ., व्हिटॅमिन C – १८ मि.ग्रॅ., अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध आहेत.
श्री. राजकुमार आतकरे, देगांव, ता. मोहोळ यांना अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयाचे विषय विशेषज्ञ श्री दिनेश क्षीरसागर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आणि कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रशिक्षण व उद्योग उभारणीस मदत झाली. राजाराणी नॅचरल फूड प्रॉडक्ट ही शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना सत्यात उतरवणारी एक शेतकऱ्यांची कंपनी आहे. या कंपनीची यशस्वी चार वर्षे पूर्ण झाली असून कंपनीचे पाचव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. श्री राजकुमार नागनाथ आतकरे तसेच सौ राणी राजकुमार आतकरे या दाम्पत्याने राजाराणी नावाने आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला. आज या नावाच्या ब्रँडची अनेक उत्पादने जसे की फळांपासून तयार केलेल्या कुल्फी, आईस्क्रीम, रबडी, बासुंदी तसेच फळांच्या मिठाई उपलब्ध आहेत. राजाराणी नॅचरल फूड प्रॉडक्ट ने ग्राहकांना नावीन्यपूर्ण व नैसर्गिक पदार्थ कसे पुरवता येतील यासाठी म.फु.कृ.वि. कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ यांच्या तांत्रिक सहाय्याने विविध फळांवर संशोधन करत आरोग्यदायी मधुमेह रुगांसाठी नवीन प्रॉडक्टची सुरूवात केली आहे. मधुमेह असणाऱ्या नागरिकांसाठी राजाराणी ब्रँड ने जांभळापासून तयार केलेली साखरेचे प्रमाण शून्य असलेली “शुगर फ्री” कुल्फी तसेच जांभूळ शॉट अशा दोन नवीन प्रॉडक्टची निर्मिती केलेली आहे. सदरच्या निर्मितीसाठी राजाराणी नॅचरल फूड प्रॉडक्ट ला कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यातील सर्व स्टाफचे विशेष तांत्रिक सहकार्य लाभले.
याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. तानाजी वळकुंडे, अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयाचे विषय विशेषज्ञ श्री दिनेश क्षीरसागर, पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी, मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विषयाच्या विषय विशेषज्ञा श्रीमती काजल म्हात्रे, कृषि विस्तार विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. विशाल वैरागर, कृषि विद्या विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. स्वाती कदम, आत्मा सोलापूर प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत, मोहोळ चे तालुका कृषि अधिकारी श्री अतुल पवार तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री. राजकुमार पाटील, श्री. गणेश शिरसट, श्री. अंकुश आतकरे, श्री. अमित वाघचवरे हे उपस्थित होते. कार्यक्रमदरम्यान उपस्थितांनी जांभूळ कुल्फी तसेच जांभूळ शॉट या नवीन दोन प्रक्रिया उत्पादनांचा आस्वाद घेतला तसेच तज्ञांनी परिक्षण करून प्रत्यात्यभरण सादर केले.


