
लातूर, दि. २९:
“आईच्या शाळेत शिक्षा नसते, परीक्षा नसते… पण त्या अनोख्या शाळेची एक हमी मात्र असते – ती म्हणजे यशस्वी जीवन!” असे हृदयस्पर्शी विचार प्रा. डॉ. सुशीलाताई पिंपळे-नारनवरे यांनी व्यक्त करताच, संपूर्ण सभागृहात मौनाची पवित्र छाया पसरली. निमित्त होते दिवंगत कमलबाई व्यंकटराव बंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित संस्कारवर्गाचे. ‘माझं घर’ या शाळाबाह्य मुलांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत, बुधोडा (औसा रोड) येथे दिनांक २८ मे रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुमेधाताई बंडे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना डॉ. सुशीलाताईंनी “आईचे शिक्षण हे कृतीशील, नि:स्वार्थ आणि मनाला भिडणारे असते. ती शिकवते ती पुस्तकातून नव्हे, तर तिच्या आयुष्याच्या प्रत्येक कृतीतून. तिच्या प्रत्येक त्यागात एक संस्कार असतो, तिच्या श्रमांमध्ये एक जीवनमूल्य दडलेले असते,” असे अत्यंत संवेदनशील शब्दांत मातृत्वाचे गौरवगान केले.
त्यानंतर त्यांनी हलक्याच पण ठोस शब्दांत आजच्या शिक्षण व्यवस्थेची सुसंस्कृत टीका करत म्हटले, “आजचे शिक्षण हे केवळ भांडवली बनले आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षकावर विश्वास असला, तरी तो विश्वास आईप्रमाणे सातत्याने समजून घेणाऱ्या शिक्षकाच्या प्रतीकृतीतच टिकतो. आजचा विद्यार्थी मोबाइलच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे कृतीशील सामाजिक बांधिलकी ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत कमलबाई व्यंकटराव बंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायंकाळच्या शांतीपूर्ण वातावरणात सामूहिक प्रार्थना सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकुमार रायवाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन ‘माझं घर’ चे संचालक श्री. शरद झरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अतिष नवगीरे यांनी केले. या प्रसंगी सौ. संगीताताई झरे, श्री. पंडितराव बंडे (कमल मिल्क एजन्सी), श्री. राजेंद्र कासार, श्री. विजय मेश्राम, कमलाकर माळी, संजय व्यवहारे, कु. अन्विता बंडे, गणपतराव तेलंगे, अय्युब पठाण, नागनाथ पिनाटे, श्रीकांत बनसोडे, फेरोज शेख, दिगंबर कांबळे, तेजस कटाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आईच्या आठवणींच्या वटवृक्षाखाली अनेक मनं नतमस्तक झाली… कारण प्रत्येक मनात एक ‘आई’ असते आणि तिची शाळा ही कायम जीवनभरासाठी उघडीच असते!

