अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वीजग्राहकही धावणार

लातूर, दि. ३१ मे : महावितरणच्या वतीने २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातूर परिमंड कार्यालयांतर्गत आज (दि १ जून) ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील काही वर्षामध्ये महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. मात्र वीजग्राहकांमध्येही विद्युत यंत्रणांपासून होणारे अपघात या बाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने, समाजामध्ये देखील विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने “शुन्य अपघात महावितरण शुन्य अपघात महाराष्ट्र” ही संकल्पना घेवून, दि. ०१ ते ०६ जून २०२५ या काळात क्षेत्रीय कार्यालयात “वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच आयोजनाचा भाग म्हणून ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१ जून रोजी सकाळी ६:३० वाजता महावितरण परिमंडळ कार्यालय किर्ती ऑईल मील समोरून सुरू होवून पीव्हीआर चौक (पाच नंबर) परत परिमंडळ कार्यालय येथे मॅरेथॉनची सांगता होईल.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” या अनुषंगाने लातूर परिमंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, जनमीत्र परिवारातील सदस्य तसेच इच्छूक वीजग्राहकांनी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांनी केले आहे.

