वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट मिळवा
लातूर, दि. ०४ जून: वसुंधरेच्या संवर्धनासाठी वीजग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा, असे आवाहन पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महावितरणने केले आहे. दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरणकडून दिली जात आहे.
महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रूपये एकरकमी सवलत देण्यात येते.
महावितरणच्या ३ कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत ६ लाख १६ हजार ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. तर लातूर जिल्हयातील ७९८३ वीजग्राहकांना गो-ग्रीन पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळ1२० रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी वसुंधरेच्या संवर्धनासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळाला ( www.mahadiscom.in) भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडावा.

